'आत्मनिर्भर' चित्रपटातून उलगडणार ज्योती कुमारी ची कथा; लॉकडाऊन काळात वडिलांना घेऊन केला होता हरियाणा ते बिहार 1200 किलोमीटरचा सायकलवर प्रवास

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आतापर्यंत पाच वेळा लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यात अनेक मजूर अडकले होते. यातील अनेकांनी पायी गावाकडची वाट धरली होती. या मजूरांचे रस्त्यात प्रचंड हाल झाले होते. बिहारमधील ज्योती कुमारी (Jyoti Kumari) या मुलीने लॉकडाऊन काळात आपल्या वडिलांना सायकलच्या मागच्या सीटवर बसवून हरियाणातील गुडगावपासून बिहारपर्यंत 1200 किमीचा प्रवास केला होता. ज्योतीच्या या कार्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली होती.

ज्योती कुमारीची मुलाखत ऐकल्यानंतर नेटीझन्स भारावून गेले होते. लॉकडाऊन काळातील ज्योतीची हिम्मत पाहून सर्वांनाचं आश्चर्य वाटलं होतं. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इवांकाने देखील ज्योतीचं कौतुक केलं होतं. तसचं 'सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया'ने ज्योतीला लॉकडाउन संपल्यानंतर दिल्लीत ट्रायल्स देण्यासाठी बोलावलं होतं. मात्र, तिने ही ऑफर नाकारली होती. ज्योतीच्या या संघर्षाची कथा आता लवकरचं रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. 'आत्मनिर्भर' असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. (हेही वाचा - Lockdown काळात वडिलांना सायकलवर घेऊन 7 दिवसांत 1200 कि.मी प्रवास करणाऱ्या ज्योती कुमारीला सायकलिंग फेडरेशन देणार संधी)

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आत्मनिर्भर चित्रपटात ज्योतीची छोटीशी भूमिका असणार आहे. Wemakefilmz या कंपनीने ज्योतीच्या या संघर्षमय कहाणीचे हक्क विकत घेतले आहेत. या चित्रपटाच्या शुटींगला ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात होणार आहे. या चित्रपटात काम करण्यास उत्सूक असल्याचं ज्योतीने सांगितलं आहे.

दरम्यान, लॉकडाऊन काळात हरियाणातील गुडगावपासून बिहारपर्यंत ज्योतीला कोणकोणते अनुभव आले? याविषयीदेखील या चित्रपटात सांगण्यात येणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण गुडगाव ते दरभंगा या मार्गावर होणार आहे. आत्मनिर्भर चित्रपटाचे दिग्दर्शक शाईन क्रिष्णा हे करणार आहेत. विषेश म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी हा चित्रपट ‘A Journey of a Migrant’ या नावाने प्रसिद्ध होणार आहे. याशिवाय हा चित्रपट प्रेक्षकांना हिंदी, इंग्रजी आणि मैथिली भाषेत पाहता येणार आहे.