तेलगू चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आपला उत्तम अभिनय आणि अॅक्शन पटांसाठी ओळखला जातो. दक्षिण भारतातील सुपरस्टार्समध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांचे चाहते हे फक्त दक्षिणेतच नाही तर, जगभर पसरलेले आहेत. तर असा हा मेगास्टार (Telugu Megastar) आज 64 व्या वर्षात पदार्पण करत आहे. चिरंजीवी यांचा जन्म 22 ऑगस्ट 1955 साली पश्चिम गोदावरी जिल्ह्यात झाला. चिरंजीवीचा पहिला चित्रपट होता 'पुनाधीरलु’ (Punadhirallu), मात्र त्याआधी त्यांचा 'प्रणम खरीदू (Pranam Khareedu) हा चित्रपट प्रदर्शित झाला.
अभिनेत्यापासून ते नेत्यापर्यंत त्यांच्या कार्कीरीदीचा आयाम फार मोठा आहे. चिरंजीवी यांनी 1978 साली आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, मात्र त्यांना भारताचा सुपरस्टार बनवले ते 1992 साली प्रदर्शित झालेल्या 'घराना मोगुदु’ या चित्रपटाने. चिरंजीवी यांचा हा 118 वा चित्रपट होता. या चित्रपटामुळे स्टार असलेले चिरंजीवी रातोरात मेगास्टार बनले होते. हा तेलगू इंडस्ट्रीमधील पहिला चित्रपट होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर 10 कोटींची कमाई केली. याच चित्रपटामुळे चिरंजीवी भारतातील सर्वात महागडे अभिनेता बनले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सध्याचा भारतातील सर्वात महागडा अभिनेता ‘प्रभास’ हा देखील तेलुगु चित्रपटसृष्टीचाच भाग आहे.
चिरंजीवी त्यावेळी अमिताभपेक्षा मोठे अभिनेते म्हणून गणले गेले होते. ऑस्कर पुरस्कारासाठी आमंत्रित केलेले ते पहिले दक्षिण भारतीय अभिनेते ठरले होते. 1987 मध्ये ते यामध्ये सामील झाले होते. दक्षिणेचा सुपरस्टार पवन कल्याण हा त्याचा धाकटा भाऊ आहे. तर अल्लू अर्जुनचे ते मामा आहेत. तेलुगु इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता राम चरण त्यांचा मुलगा आहे. अशाप्रकारे तेलुगुमधील मातब्बर मंडळी ही चिरंजीवी यांच्याच कुटुंबातील आहेत. (हेही वाचा: Gulzar Birthday Special: गुलजार यांच्या 'या' गाण्याला आर.डी.बर्मननी नकार दिल्यावर, आशा भोसले यांनी बनवली चाल; 'असे' तयार झाले अनेक पुरस्कारप्राप्त गीत)
कदाचित चिरंजीवी भारतातील असे एकमेव अभिनेते असतील ज्यांनी तब्बल 11 चित्रपटात दुहेरी भूमिका केल्या आहेत. तर एका चित्रपटात तिहेरी भूमिका केली आहे. त्यांनी विजया शांती या अभिनेत्रीसोबत सर्वात जास्त चित्रपट केले आहेत. तसेच त्यांनी तीन हिंदी चित्रपटही केले आहेत. 1980 साली चिरंजीवी यांचे तब्बल 14 चित्रपट प्रदर्शित झाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व चित्रपट हिट ठरले होते.
आता सर्वत्र चर्चा आहे ती त्यांच्या नव्या ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ (Sye Raa Narasimha Reddy) या चित्रपटाची. चिरंजीवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अमिताभ बच्चनदेखील झळकणार आहे. हा चित्रपट तब्बल 5 भाषांमध्ये बनत आहे. अशाप्रकारे यावर्षी प्रदर्शित होणारा हा चित्रपट चिरंजीवी यांचा 153 वा चित्रपट ठरणार आहे.