प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या लोणावळ्यातील बंगल्याला 2 लाख 8 हजार रुपयांचे बिल; महावितरणकडे दाखल केली तक्रार
Asha Bhosle (Photo Credits: Facebook)

लॉकडाऊन (Lockdown) काळात वाढीव वीज बिलामुळे (Light Bill) सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. आता प्रख्यात गायिका आशा भोसलेदेखील (Asha Bhosle) याच तक्रारीने त्रस्त झाल्या आहेत. त्यांनी आपल्या लोणावळ्यातील बंगल्याला 2 लाख 8 हजार रुपयांचे बिल आल्याची तक्रार केली आहे.

इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आशा भोसले यांना जून महिन्याचे वीज बिल तब्बल 2 लाख 8 हजार 870 रुपये आले आहे. त्यामुळे त्यांनी महावितरणकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. परंतु, या तक्रारीनंतर महावितरणने हे बिल प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन केल्याचा दावा केला आहे. (हेही वाचा -  बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ने मुंबई पोलिसांना केले 'फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिवाइस'चे वाटप; आदित्य ठाकरे यांनी मानले आभार)

दरम्यान, आशा भोसले यांना मे महिन्यात 8 हजार 855 रुपये, तर एप्रिल महिन्यात 8 हजार 996 रुपये इतके बिल आले होते. त्यामुळे जून महिन्यात आलेले लाखो रुपयांचे बिल नेमके कशाचे असा प्रश्न आशा भोसले यांना पडला आहे.

विशेष म्हणजे, आशा भोसले यांच्या तक्रारीनंतर महावितरणचे पुण्यातील वरिष्ठ अधिकारी लोणावळ्यातील बंगल्यातील रीडिंग चेक करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यावेळी त्यांना मीटर योग्य असल्याचं म्हटलं होतं. आशा भोसले यांच्या बंगल्यात गेल्या काही दिवसांपासून चित्रीकरणाचे काम सुरु होते.

यापूर्वी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी वाढीव वीज बिलाच्या तक्रारी केल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनेदेखील वाढीव वीज बिलासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तक्रार केली होती.