Arbaaz Khan to Marry Shura Khan: अरबाज खान व शूरा खान अडकणार लग्नबंधनात; मुंबईत 24 डिसेंबरला पार पडणार विवाहसोहळा- Reports
Arbaaz Khan (Photo Credit: Instagram)

Arbaaz Khan to Marry Shura Khan: मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान (Arbaaz Khan) जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. मात्र अलीकडेच जॉर्जियाने अरबाजसोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांना पुष्टी दिली. आता अहवालानुसार, अरबाज खानच्या आयुष्यात नव्या प्रेमाने प्रवेश केला आहे. इतकेच नाही तर तो आता लग्नबंधनात अडकणार आहे. अहवालानुसार, अरबाझ खान बॉलीवूड मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत (Shura Khan) लग्न करण्याच्या तयारीत आहे. शूरा खान एक लोकप्रिय बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट आहे.

पिंकविलाच्या मते, शूरा खान ही बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी यांची मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अरबाज खान आणि शूरा खान 24 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांची भेट त्यांचा नवीन चित्रपट 'पटना शुक्ला'च्या सेटवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अरबाज खानचे पहिले लग्न मलायका अरोरासोबत झाले होते आणि त्यांना एक मुलगाही आहे. दोघांनी 2016 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली आणि लग्नाच्या 19 वर्षानंतर 11 मे 2017 रोजी अधिकृतपणे घटस्फोट घेतला.

यापूर्वी, पिंकविलाशी बोलताना अरबाझची माझी गर्लफ्रेंड जॉर्जियाने अरबाजसोबतच्या ब्रेकअपची पुष्टी केली होती. ती म्हणाली होती, ‘आम्ही बेस्ट फ्रेंड्ससारखे होतो, मला त्याच्याप्रति (अरबाज खान) नेहमीच भावना असतील. त्याचे मलायका अरोरासोबतचे नाते आमच्या नातेसंबंधाच्या आड आले नाही. परंतु मला फक्त त्याची गर्लफ्रेंड बनून राहायचे नव्हते. आम्हा दोघांना माहीत होते की आमचे नाते कायमचे टिकणार नाही.’ (हेही वाचा: Mugdha-Prathamesh Wedding: मुग्धा वैशंपायन - प्रथमेश लघाटे अडकले विवाहबंधनात)

आता अरबाज खान आणि शूरा खान मुंबईत जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या साक्षीने लग्नगाठ बांधत आहेत. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अरबाज आणि शूराने त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे. लग्नाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य शेअर करण्यात आलेले नाही. अरबाजचा आगामी चित्रपट 'पटना शुक्ला' पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रवीना मुख्य भूमिकेत आहे.