बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) आपल्या एकूण कारकीर्दीमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सलमान खानचा असाच एक सुपरहिट चित्रपट, ज्याच्या तीनही भागांना प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तो म्हणजे दबंग (Dabangg)! सलमानच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे, दबंगचा अॅनिमेटेड अवतारही (Animated Version) लवकरच दिसणार आहे. अॅनिमेटेड दबंग दोन सिझनमध्ये प्रदर्शित होणार असून, पहिल्या सिझनमध्ये 52 भाग असतील. अॅनिमेटेड दबंगच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांनी अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मशी संपर्क साधला आहे. याबाबत अभिनेता-निर्माता अरबाज खान म्हणतो की, ‘दबंगचे वैशिष्ट्य म्हणजे तो एक फॅमिली एंटरटेन्टर आहे आणि त्याच्या अॅनिमेटेड व्हर्जनच्या माध्यमातून अॅनिमेशनच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचे आमचे लक्ष्य आहे.’
अरबाज खानने पीटीआयला सांगितले की, 'हे माध्यम कथा सांगण्यासाठी एक सर्जनशील स्वातंत्र्य देखील प्रदान करते आणि यासाठी आम्ही कथेच्या वैशिष्ट्यांकडेही लक्ष देऊ शकतो.’ अशाप्रकारे लवकरच चुलबुल पांडेची (Chulbul Pandey) व्यक्तिरेखेचे साहस यापूर्वी कधीही पाहिले गेले नसलेल्या अॅनिमेशनमध्ये दिसणार आहे. दबंग अॅनिमेशनला कॉसमॉस-माया बनवत आहे. यामध्ये चित्रपटातील चुलबुल पांडेच्या व्यक्तिरेखेकडे विशेष लक्ष दिले जात आहे, जी सलमान खानने साकारली होती. (हेही वाचा: सलमान खान चे ईद निमित्त प्रदर्शित 'भाई भाई' गाणे सोशल मिडियावर घालतय धुमाकूळ, काही तासांतच 40 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज)
या शोमध्ये चित्रपटामधील सर्व आयकॉनिक पात्रांचा अॅनिमेटेड अवतार दिसणार आहे, जी चाहत्यांसाठी एक पर्वणी असेल. सोनाक्षी सिन्हा (रज्जो), प्रजापती (दिवंगत विनोद खन्ना) आणि तीन व्हिलन चेदी सिंग (सोनू सूद), बच्चू भैय्या (प्रकाश राज), बाली (सुदीप) देखील अॅनिमेटेड अवतारात दिसतील. आतापर्यंत ही सिरीज कोणत्या चॅनेलवर किंवा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल, याबाबत काहीही माहिती समोर आली नाही. परंतु लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा होईल.