Amitabh Bachchan Kaun Banega Crorepati 12 (Photo Credits: Twitter)

अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना बॉलिवूडचा महानायक म्हटले जाते. कित्येक दशकांपासून महानायक असण्याचा टॅग ते सिद्ध करत आले आहेत. नुकतेच त्यांनी कोरोना विषाणूशी (Coromavirus) लढा देऊन त्यावर मात केली. आता या आजारातून बरे झाल्यावर लगेचच अमिताभ बच्चन कामावर परतणार आहेत. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी जोडले असलेल्या अमिताभ बच्चन यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. कोरोनाला पराभूत करून आणि आता क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर, अमिताभ बच्चन लवकरच केबीसी प्रोमो शूट (Kaun Banega Crorepati 12 Promo Shoots) करणार आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे की, त्यांनी 'कौन बनेगा करोडपती' या टीव्ही क्विझ शोची तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काळजी घेऊन ही तयारी केली जात आहे. अशाप्रकारे कोरोनाविरूद्धची लढाई जिंकून आपण कामावर परतत असल्याचे त्याने सांगितले. ते लवकरच केबीसी प्रोमो शूट करणार आहेत व केबीसी शोसाठी तयारीही सुरू झाली आहे. आपल्या ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘आता सर्व काही बदलले आहे, पूर्वीप्रमाणे काही राहिलेले नाही. पूर्ण सुरक्षिततेसह हे शूट कसे केले जाईल याबाबत प्रोटोकॉल तयार केला आहे.’

(हेही वाचा: बिग बॉस 14 च्या प्रोमो मधून सलमान खान ने 2020 मनोरंजनाचा सीन पलटण्याचा केला दावा, Watch Video)

आपल्या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी कामाबद्दल बोलताना, मध्यरात्री आपला मुलगा अभिषेक बच्चन याच्यासमवेत यूईएफए खेळाचा कसा आनंद घेत आहेत आणि टीव्हीवर फुटबॉल कसा एन्जॉय करत आहेत, हे देखील सांगितले आहे. दरम्यान, 11 जुलै रोजी अभिषेक बच्चनने ट्वीट करत माहिती दिली होती, तो व अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूला लागण झाली आहे. त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. या सर्वावांवर नानावटी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.