Amitabh Bachchan (PC- PTI)

भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपला अद्वितीय अभियान, आपली प्रतिभा आणि समर्पणाद्वारे चित्रपटसृष्टीवर मोठी छाप सोडली आहे. पाच दशकांहून अधिक काळ अमिताभ बच्चन यांची कारकिर्दी चालत आली असून, ते केवळ अभिनेताच म्हणून नव्हे तर, एक आदर्श म्हणूनही पाहिले जातात. महानायक अमिताभ बच्चन हे येत्या 11 ऑक्टोबर रोजी आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्याआधी त्यांच्या स्मृतीचिन्हांचा सर्वात मोठा लिलाव आयोजित केला गेला आहे.

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या आधी deRivaz & Ives या संस्थेद्वारे हा अनोखा सार्वजनिक लिलाव केला जाणार आहे. यासाठी दिनांक 5 ते 7 ऑक्टोबर 2023 रोजी ‘बच्चनलिया’ नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. या कार्यक्रमामध्ये चाहत्यांना अमिताभ बच्चन यांच्याशी निगडीत काही वस्तू खरेदी करण्याची संधी मिळेल.

लिलाव होणार्‍या वस्तूंमध्ये चित्रपट पोस्टर्स, छायाचित्रे, लॉबी कार्ड, शोकार्ड, चित्रपट पुस्तिका आणि काही मूळ कलाकृती यांचा समावेश आहे. यामध्ये यामध्ये जंजीर, फरार आणि दीवार चित्रपटांचे शोकार्ड्स आहेत. लॉबी कार्ड्सवरील शोलेच्या प्रतिमा, तसेच शोलेच्या रिलीजनंतर आयोजित केलेल्या रमेश सिप्पी यांच्या खास पार्टीतील चार वैयक्तिक छायाचित्रांचा एक आकर्षक संच, अमिताभ बच्चन यांच्या- मजबूर (1974), मिस्टर नटवरलाल (1979), द ग्रेट गॅम्बलर (1979), सिलसिला (1981), कालिया (1981), नसीब (1986) अशा चित्रपटांचे अनोखे पोस्टर्स, प्रसिद्ध ग्लॅमर फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी चित्रपट मासिकाच्या प्रसिद्ध कव्हर स्टोरीसाठी केलेल्या, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या फोटोशूटमधील फोटो, अशा अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. (हेही वाचा: Dadasaheb Phalke Lifetime Achievement Award 2023: ज्येष्ठ अभिनेत्री Waheeda Rehman यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर)

लिलावाबद्दल बोलताना, deRivaz & Ives प्रवक्त्याने सांगितले की, ते त्यांचा चित्रपट संस्मरणीय विभाग यावर्षी जागतिक स्तरावर वाढवण्याचा विचार करत आहेत आणि हॉलिवूडचा लिलाव 2024 मध्ये सुरू होणार आहे. आता अमिताब बच्चन यांच्याशी निगडीत होणाऱ्या वस्तूंच्या लिलावामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. इच्छुक चाहते या लिंकवर क्लिक करून अधिक माहिती प्राप्त करू शकतात.