Arrest | (Photo credit: archived, edited, representative image)

Vedika Shetty Fraud: जुहू पोलिसांनी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिच्या माजी वैयक्तिक सहायिका, वेदिका प्रकाश शेट्टी (वय 32) हिला अटक (Alia Bhatt, Alia Bhatt PA Arrest) केली आहे. तिच्यावर आलिया आणि तिच्या निर्मिती कंपनी इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन (Eternal Sunshine Productions Private Limited) यांच्याकडून एकूण ₹76,90,892 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वेदिका शेट्टी हिला बेंगळुरू येथून अटक करून पाच दिवसांच्या ट्रांझिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले असून मंगळवारी तिला शहर न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर फसवणूक मे 2022 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत करण्यात आली. आलियाची आई आणि इटर्नल सनशाइन प्रॉडक्शनमध्ये संचालिका असलेल्या सोनी राजदान यांनी 23 जानेवारी रोजी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

जुहू पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरुन, वेदिका शेट्टी हिच्याविरुद्ध IPC कलम 406 (विश्वासघात) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. ती मारोलमधील NG को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रोड येथे राहत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, आलियाच्या सचिव म्हणून तिच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या होत्या, ज्याचा गैरफायदा घेत तिने कंपनी आणि वैयक्तिक खात्यांतून पैसे वळते केले.

आलिया भट्ट ही सध्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती ₹550 कोटी एवढी असून, 2021 मध्ये तिने Eternal Sunshine Productions या बॅनरची स्थापना केली. या बॅनरअंतर्गत तिचा पहिला प्रकल्प Netflix वरील ‘Darlings’ प्रदर्शित झाला होता, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या निर्मिती कंपनीची सध्याची अंदाजे किंमत ₹80 कोटी आहे.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, आलिया भट्ट लवकरच संजय लीला भन्साळींच्या ‘Love And War’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि विक्की कौशल हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट 2026 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच ती YRF Spy Universe या फ्रँचायझीतील पहिली अभिनेत्री ठरणार आहे, जिथे ती ‘Alpha’ या चित्रपटात शर्वरी हिच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.