बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या 'पृथ्वीराज' सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत सिनेमाचे नाव बदलण्याची मागणी करणी सेनेने (Karni Sena) केली आहे. पृथ्वीराज हा सिनेमा महान राज्यकर्ता पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. अशावेळी सिनेमाचे नाव पृथ्वीराज ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सिनेमाचे नाव बदलण्याची आमची मागणी करण्यात आल्याचे करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते सुरजीत सिंह राठौड़ यांनी म्हटले आहे. तसंच सिनेमात त्यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख करुन नाव बदलून सन्मानार्थ नाव ठेवण्यात यावे, असेही ते म्हणाले.
इतकंच नाही तर सिनेमा रिलीज करण्यापूर्वी आम्हाला दाखवण्यात यावा आणि जर आमचे म्हणणे मानले नाही तर याचे परिणाम भोगण्यास तयार रहा, असा इशाराही सुरजीत सिंह यांनी दिला आहे. तसंच पद्मावतच्या वेळी झालेल्या वादाची आठवण करुन देत या सिनेमाच्या निर्मात्यांनाही त्यासाठी तयार रहावे लागेल, असंही सेनेने म्हटले आहे.
'पृथ्वीराज' सिनेमाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्रिवेदी करत असून आदित्य चौपडा सिनेमाची निर्मिती करत आहे. यात अक्षय कुमार सोबत मानुषी छिल्लर झळकणार आहे. यात ती अक्षय कुमारच्या पत्नीची संयुक्ता ही भूमिका साकारणार आहे. (Sooryavanshi: रोहित शेट्टीने अक्षय कुमारचा चित्रपट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बातचीत करुन पुढे ढकलला)
दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2019 साली वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने या सिनेमाची घोषणा केली होती. तसंच पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारायला मिळणार असल्याचा आनंदही सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला होता. दरम्यान, करणी सेनेने यापूर्वी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांवर आपेक्ष घेतला होता. सिनेमांवरील दृश्य, गाणी याविरुद्ध संघटनेने आवाज उठवला होता.