Nagraj Manjule: 'झुंड'नंतर नागराज मंजुळेंनी आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा केली व्यक्त, आमिर खानदेखील आहे तयार
Nagraj Manjule And Amir Khan (Photo Credit - PTI and FB)

अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्टारर 'झुंड' (Jhund) हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या स्पोर्ट्स-ड्रामा चित्रपटाला चाहत्यांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नागराज मंजुळे यांनी अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता सुपरस्टार आमिर खानसोबत (Amir Khan) काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे. आमिर खानने 'झुंड' सिनेमाचे कौतुक केले आहे. सिनेमा पाहिल्यानंतर आमिरने सिनेमातील कलाकारांचीदेखील भेट घेतली. 'फँड्री' (Fandry) या पहिल्या चित्रपटापासून ते सुपरस्टारसोबत काम करण्याचा विचार करत होते. 'झुंड' बनवण्यात आमिरचाही हात असल्याचे नागराज मंजुळे यांनी सांगितले. मला खूप दिवसांपासून आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा आहे. तसेच मी यावर गांभीर्याने विचार करत आहे.

'झुंड'मध्ये अमिताभ बच्चन निवृत्त झालेल्या 'विजय बरसे' या क्रीडा शिक्षकाच्या भूमिकेत आहेत. पण, निवृत्तीनंतरही तो झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉल शिकवतो. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि नागराज मंजुळे यांनी केली आहे. चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज, तांडव फिल्म्स एंटरटेनमेंट आणि आटपाट फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली झाली आहे. (हे ही वाचा Attack New Poster: जॉन अब्राहम 'अटॅक'साठी सज्ज, 'या' दिवशी ट्रेलर होणार प्रदर्शित)

चित्रपट पाहून आमिर झाला होता भावूक 

प्रदर्शनपूर्वी, आमिर खानने निर्माते आणि टीमसोबत एका खाजगी विशेष स्क्रीनिंगमध्ये 'झुंड' पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर आमिर खान खूप भावूक झाला आणि रडू लागला. एवढेच नाही तर त्यांनी अमिताभ, निर्माते आणि चित्रपटाचे जोरदार कौतुक केले. ज्याचा एक व्हिडिओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.