मुंबई मध्ये अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांचा मुलगा आदित्य पौडवाल (Aditya Paudwal) चं वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. आदित्यच्या इतक्या कमी वयात हे जग सोडून जाण्याची बातमी अनेकांसाठी क्लेषकारक आहे. दरम्यान आई अनुराधा पौडवाल आणि वडील अरूण पौडवाल यांच्याकडून आदित्यला मिळालेला संगीत कलेचा वारसा त्याने समर्थपणे पुढे चालवला. आदित्य संगीतकार, म्युझिक अरेंजर म्हणून मराठी आणि बॉलिवूडमध्ये काम करत होता. मात्र मागील काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने (Kidney Failure) त्रासलेल्या आदित्यची या आजारा सोबतची लढाई अयशस्वी ठरली आणि अखेर आज (12 सप्टेंबर) त्याने या जगाचा निरोप घेतला आहे. 35 वर्षाच्या आदित्यने कमी वयातही लक्षात राहतील अशा अनेक मोठ्या संधींना गवसणी घातली आहे. त्याने अनेक रचना चाहत्यांना, कलासक्त व्यक्तींना दिल्या आहेत. जाणून घ्या कशी होती आदित्य पौडवालची सांगितिक कारकीर्द.
आदित्य पौडवालचा सांगितिक प्रवास
- आदित्य पौडवालला संगीत क्षेत्राची ओळख त्याच्या वडीलांनी म्हणजेच स्वर्गीय अरूण पौडवाल यांनी करून दिली. आदित्य अवघा 3 वर्षाचा असताना तो अरूण पौडवाल यांच्यासोबत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जात होता. अरूण पौडवालांनी आदित्यला तो सहा वर्षांचा असल्यापासून शिकवण्यास सुरूवात केली.
- आदित्य पौडवाल याने पुढे न्यूयॉर्क म्युझिक अकॅडमी मधून संगीतामध्ये उच्च शिक्षण घेतले. पुढे भारतामध्ये परतल्यावर तो शंकर एहसान लॉय यांच्यासोबत काम करायला लागला.
- शंकर एहसान लॉय प्रमाणेच त्याने अनु मलिक, ए आर रेहमान यांच्याबरोबर पण काम केले आहे.
- 1993 साली श्री साई महिमा या तेलगू सिनेमाला संगीत दिल्यानंतर त्याचा समावेश Limca Book Of World Record मध्ये आशियातील सर्वात कमी वयाचा संगीतकार म्हणून झाला.
- नवाझुद्दीन सिद्दिकीच्या ठाकरे सिनेमातील 'साहेब तू' गाण्याचे संगीत दिग्दर्शन आदित्य पौडवालने केले होते.
- जॅकी भगनानी सोबत आदित्यने 'कृष्ण महामंत्र' हा म्युझिकल ट्रक बनवला होता. पुढे तो फेब्रुवारी 2020 साली रिलीज झाला.
- काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवात उमागणपती हा सिंगल देखील आदित्यने आई अनुराधा पौडवाल सोबत केला होता.
दरम्यान आदित्यची बहीण कविता पौडवाल देखील गायिका आहे. आदित्य-कविता देखील एकत्र गाताना यापूर्वी दिसले आहेत. आदित्यच्या निधनाचं वृत्त समजताच सोशल मीडीयात शंकर महादेवन, मराठी संगीतकार कौशल इनामदार यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.