अभिनेत्री शबाना आझमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल
Actress Shabana Azmi Car Accident | (Photo Credit: Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी (Actress Shabana Azmi) यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Expressway) खालापूर (Khalapur) टोलनाक्याजवळ त्यांच्या वाहनाला अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात शबाना आझमी यांना दुखापत झाली असून त्यांना पनवेल (Panvel) येथील एमजीएम रुग्णालय (MGM Hospital) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात शबाना आझमी (Shabana Azmi) सुरक्षीत असून त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही.

शबाना आझमी या आपल्या खासगी कारमधून मुंबई येथून पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. सुट्टी साजरी करण्यासाठी त्या खंडाळा येथे निघाल्या होत्या. अपघातात त्यांच्या नाकाला आणि तोंडाला दुखापत झाल्याची माहिती आहे. खालापूर टोलनाक्याजवळ आल्यावर त्यांच्या कारने रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिणीने दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, शबाना आझमी यांच्यासोबत कारचालक आणि आणखी एक व्यक्ती असे मिळून तीघेजन कारने प्रवास करत होते. आझमी यांच्या कारचा चालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. (हेही वाचा, अहमदनगर: नगर-दौड महामार्गावर भीषण अपघात; भरधाव गाडीने दिली ट्रक ला धडक)

ट्विट

शबाना आझमी यांचे पती जावेद अख्तर यांचा 75 वा वाढदिवस नुकताच पार पडला. गेली तीन दिवस हा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात होता. त्यासाठी विविध पार्टी, प्रदर्शन आणि कार्यक्रमांचे आयोजन केले होते. खास करुन जावेद अख्तर यांच्या वाढदिवसानिमित्त शबाना आझमी यांनी आयोजित केलेल्या एका पार्टीला आमिर खान, दीपिका पादुकोण, किरण राव यांच्यासह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमांनतर शबाना आझमी पुण्याला निघाल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या वाहनाला अपघात घडला.