कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटसृष्टीला हा महामारीचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे जिथे चित्रपटांचे शूटिंग थांबल्याने लोक घरी बसले आहेत, तर दुसरीकडे अनेक अभिनेते-अभिनेत्री किंवा त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. आता बातमी मिळत आहे की, बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) संपूर्ण कुटुंबाला कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. सर्वात आधी दीपिकाचे वडील व प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण (Prakash Padukone) यांना कोरोनाचा संसर्ग झाला व त्यानंतर आता दीपिकाची आई व बहीणही कोरोना सकारात्मक असल्याचे आढळले आहे.
सर्वात आधी प्रकाश पादुकोण यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली, त्यानंतर त्यांची चाचणी सकारात्मक आल्यानंतर त्यांना बंगळुरूच्या भगवान महावीर जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनतर दीपिकाची आई उज्जला पादुकोण आणि बहीण अनीषा पादुकोण याही कोरोना विषाणू सकारात्मक असल्याचे आढळले. वृत्तानुसार, कुटुंबातील एका खास मित्राने सांगितले की, 10 दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या कुटूंबामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसली होती.
प्रकाश पदुकोण यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि या क्षणी त्यांची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. उज्वला व अनीषा पादुकोण या घरीच आयसोलेट झाल्या आहेत. प्रकाश पादुकोण यांनी अलीकडेच कोरोना लसचा पहिला डोस घेतला होता आणि ते लवकरच दुसरा डोस घेणार होते. परंतु त्याआधीच त्यांना कोरोनाची लागण झाली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. (हेही वाचा: Bigg Boss 14 फेम Nikki Tamboli चा भाऊ Jatin Tamboli चे COVID-19 मुळे निधन; अभिनेत्रीने शेअर केली भावूक पोस्ट)
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक नामांकित लोकांना कोविड 19 ची लागण झाली आहे. यामध्ये रणधीर कपूर, आमिर खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अक्षय कुमार, कतरिना कैफ, विक्की कौशल, भूमि पेडणेकर, सिद्धांत चतुर्वेदी, आदित्य नारायण, आर माधवन यांच्यासह इतर अनेक स्टार्सचा समावेश आहे.