Rashmika Mandanna's Deepfake Video Case: अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) हिच्या डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) शी संबंधित प्रकरणातील मुख्य आरोपीला शनिवारी दिल्ली पोलिसांनी आंध्र प्रदेशात अटक केली आहे. रश्मिकाचा एक डीपफेक व्हिडिओ नोव्हेंबर 2023 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये, काळ्या वर्कआउट ड्रेसमध्ये झारा पटेलच्या व्हिडिओवर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला होता. या घटनेनंतर, दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 465 (बनावट) आणि 469 (प्रतिष्ठेला हानी पोहोचवणे) आणि माहिती तंत्रज्ञानाच्या कलम 66C (ओळख चोरी) आणि 66E (गोपनीयतेचे उल्लंघन) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
‘पुष्पा’, ‘मिशन मजनू’ आणि आगामी ‘अॅनिमल’ यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रश्मिका मंदान्नाने तिचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तंत्रज्ञानाच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली होती. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, मंदान्नाने सांगितले की, हा व्हिडिओ पाहून ती खरोखर दुखावली आहे. (हेही वाचा -Rashmika Mandanna's Deepfake Video: रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मेटाकडून मागवली माहिती)
तथापी, या व्हिडिओमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सरकारने या व्हिडिओवर कारवाई करण्याचे आवाहन केले होते. डीपफेक ही एक डिजिटल पद्धत आहे, जिथे एखादी व्यक्ती कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या व्यक्तीच्या प्रतिमेला खात्रीपूर्वक बदलू शकते. (हेही वाचा - Rashmika Mandanna Morphed Viral Video: रश्मिका मंदानाचा मॉर्फ केलेला व्हिडिओ वायरल झाल्यानंतर Union Minister Rajeev Chandrasekhar यांचे कठोर कारवाईचे आदेश)
दरम्यान, या आठवड्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. संपादित केलेल्या व्हिडिओमध्ये, सचिन एका ऑनलाइन गेमचा प्रचार करताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर क्रिकेटपटूने पोस्ट शेअर करत हा व्हिडिओ बनावट असल्याचं सांगितलं. तसेच या बनावट व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.