Academy Awards 2022: ऑस्कर 2022 साठी भारताकडून Sherni आणि Sardar Udham यांना नामांकन; लवकरच होणार ऑफिशियल एन्ट्रीची घोषणा
ऑस्कर पुरस्कार (Photo Credit : Youtube)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) गेले अनेक महिने ओटीटी व्यासपीठ लोकांचे मनोरंजन करत आहे. गेली दोन वर्षे चित्रपटगृहे बंद असूनही भारतीय चित्रपटसृष्टीने अनेक उत्तम चित्रपट प्रेक्षकांना दिले. यादरम्यान चित्रपट विश्वातील मानाचा ऑस्कर पुरस्कारही (Oscars 2021) पार पडला. आता वेध लागले आहेत ते 2022 च्या ऑस्कर पुरस्कारांचे (Academy Awards 2022). भारतातून ऑस्कर प्रवेशासाठी चित्रपट निवड प्रक्रिया सोमवारी कोलकाता येथे सुरू झाली. शाजी एन करण यांच्या अध्यक्षतेखाली फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 15 सदस्यीय ज्यूरीने अकादमी पुरस्कारांमध्ये भारताच्या प्रवेशासाठी 14 चित्रपटांची निवड केली.

आता माहिती मिळत आहे की, बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता विक्की कौशल यांचे अनुक्रमे ‘शेरनी’ (Sherni) आणि ‘सरदार उधम’ (Sardar Udham) या चित्रपटांची पुढील वर्षीच्या ऑस्करसाठी निवड झाली आहे. या दोन्ही चित्रपटांची ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ‘फिचर फिल्म’ श्रेणीसाठी निवड झाली आहे. आता ज्युरी पुढील वर्षी होणाऱ्या 94 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्तम परदेशी भाषा श्रेणी’साठी चित्रपट निवडतील.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, नुकतेच ऑस्करच्या ज्युरी सदस्यांसाठी कोलकात्यात 14 चित्रपटांची स्क्रीनिंग झाली. त्यानंतर विद्या बालनचा शेरनी चित्रपट आणि विकी कौशलचा सरदार उधम या चित्रपटांना नामांकन मिळाले. हे दोन्ही चित्रपट या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाले आहेत. शेरनी चित्रपटात विद्या बालनने वन अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

सरदार उधम या चित्रपटात विकी कौशलने ‘सरदार उधम’ची कथा मोठ्या पडद्यावर खूप उत्तमरित्या साकारली आहे. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून एका ब्रिटिश अधिकाऱ्याला सरदार उधमने गोळ्या घातल्या होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले आहे. (हेही वाचा: लवकरच येणार Game of Thrones चा प्रीक्वल, दिसणार 200 वर्षांपूर्वीची कथा; समोर आला 'हाऊस ऑफ द ड्रॅगन'चा भव्य टीजर)

दरम्यान, 94 वा अकादमी पुरस्कार अमेरिकेत मार्च 2022 मध्ये आयोजित केला जाईल. ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट निवडण्याची प्रक्रिया कोलकाताच्या भवानीपूर येथील बिजोली सिनेमा येथे आयोजित केली जात आहे. गेल्या वर्षी, जोस पेलिसरी दिग्दर्शित मल्याळम चित्रपट ‘जल्लीकट्टू’ ऑस्करला पाठवण्यात आला होता.