कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) राज्याने अनेक महत्वाच्या लोकांना गमावले. आता यामध्ये 75 वर्षीय भाषा अभ्यासक सुहास लिमये यांचे नावही सामील झाले. लिमये (Suhas Limaye) यांचे बुधवारी करोनामुळे सैफी रुग्णालयात निधन झाले. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या चारही भाषांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. अनेकांना त्यांनी मराठी शिकवण्याचेही काम केले. असाच त्यांचा एक विद्यार्थी होता अभिनेता आमिर खान (Aamir Khan), होय आमिरला मराठी शिकवण्याचे काम सुहास लिमये यांनी केले होते. लिमये यांच्या मृत्युच्या बातमीने आमीरला चांगलाच धक्का बसला असून, त्याबाबत आपल्या भावना व दुःख त्याने सोशल मिडीयावर व्यक्त केले आहे.
याबाबत आमिर खान म्हणतो, ‘श्री.सुहास लिमये यांचे काल निधन झाले. माझ्या मराठी सरांच्या मृत्यूची बातमी ऐकून फार वाईट वाटले. सर तुम्ही माझ्या उत्तम शिक्षकांपैकी एक होता. मी तुमच्याबरोबर व्यतीत केलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. विविध गोष्टींची उत्सुकता, शिकण्याची व इतरांबरोबर गोष्टी शेअर करण्याच्या आपल्या वृत्तीमुळे आपण एक महान शिक्षक बनला. आपण जे 4 वर्षे एकत्र घालवले ते सर्वात संस्मरणीय होते. तो प्रत्येक क्षण मी माझ्या आठवणीत कोरला आहे. तुम्ही मला फक्त मराठीच शिकवले नाहीत, तर इतर अनेक गोष्टी मी तुमच्याकडून शिकलो.’
शेवटी आमिर म्हणतो, ‘खूप धन्यवाद, तुमची नेहमीच खूप आठवण येईल. तुमच्या कुटुंबीयांबद्दल मनापासून सहानुभूती.’
पहा पोस्ट -
— Aamir Khan (@aamir_khan) September 3, 2020
तर अशाप्रकारे एक शिक्षक म्हणून सुहास लिमये यांनी अनेकांना प्रेरणा दिली होती. मराठी आणि संस्कृतचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या अमराठी भाषकांसाठी लिमये यांनी विनामुल्य अध्यापन केले होते. मराठी भाषेचे व्याकरण सहा पातळ्यांमध्ये विभागून कसे शिकवले जावे, याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी केले. (हेही वाचा: अभिनेता सुबोध भावे याला कोरोनाची लागण, पत्नी मंंजिरी आणि मुलगा कान्हा सुद्धा पॉझिटिव्ह)
दरम्यान, आमिर खान सध्या आपल्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचे शुटींगचे वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी नुकताच तो तुर्कीला गेला होता. लालसिंह चड्ढा हा हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असून त्यामध्ये आमिर सोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत आहे.