20 नोव्हेंबरपासून गोव्यात 50 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (50th International Film Festival of India) सुरु होत आहे. हा सुवर्ण जयंती महोत्सव पूर्वीपेक्षा अधिक संस्मरणीय आणि नेत्रदीपक बनविण्यासाठी यामध्ये काही नवीन विभागांचा समावेश केला जात आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे, क्लासिक मूक चित्रपट. विशेष म्हणजे या मूक चित्रपटांच्या प्रदर्शनावेळी ब्रिटनचे प्रसिद्ध पियानो वादक जॉनी बेस्ट संगीत सादर करणार आहेत. हा 50 वा महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन खास पाहुणे असणार आहेत. या महोत्सवात 76 देशांमधील 200 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत.
या महोत्सवात असे अनेक चित्रपट दाखविले जातील, ज्यांच्या रिलीजने 2019 मध्ये 50 वर्षे पूर्ण केली आहेत. यामध्ये धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यांच्यासारख्या सुपरस्टार्सच्या अनेक क्लासिक चित्रपटांचा समावेश आहे. गोल्डन लाइनिंग विभागात धर्मेंद्रचा 'सत्यकाम' आणि राजेश खन्नाचा 'आराधना' असेल. हे दोन्ही चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाले होते. या चित्रपट महोत्सवात अभिनेता रजनीकांत यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. इंडियन पॅनोरोमा विभागात 26 फिचर चित्रपट आणि 15 नॉन फिचर चित्रपटांचा समावेश आहे. (हेही वाचा: चित्रपटसृष्टीत बॉलिवूड शेहनशाह अमिताभ बच्चन यांचे 'अर्धशतक'!)
मूक चित्रपट विभागात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांपैकी दिग्गज रशियन चित्रपट निर्माते एम. इंस्टीन यांची फिल्म बॅटलशिप पोटेमकिन, जर्मन चित्रपट निर्माते बी. पाब्स्टचा चित्रपट पँँडोरास बॉक्स आणि सस्पेन्स चित्रपटांसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक अल्फ्रेड हिचकॉकचा चित्रपट ब्लॅकमेल यांचा समावेश आहे. हे चित्रपट 22, 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी दाखवण्यात येतील. यावेळी महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजक विभागांमध्ये ऑस्कर रेट्रोस्पेक्टिव्ह, डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म्स विभाग, वर्ल्ड पॅनोरेमा, गोल्डन ज्युबिली रेट्रोस्पेक्टिव, श्रद्धांजली आणि रीस्टोअर केलेल्या भारतीय क्लासिक चित्रपटांचा समावेश आहे.