Bigg Boss Marathi 2, Episode 6 Highlights: कालच्या भागात या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आहे. या सर्व प्रक्रीयेदरम्यान बिचुकले यांचे असलेले वागणे सदस्यांना अजिबात आवडले नाही. त्यामुळे झालेला रूपालीचा राग, नेहाचा त्रागा आपण पाहिलात. आजच्या भागाची सुरुवात बिचुकले आणि सुरेखा यांच्या टीआरपीबद्दलच्या बोलण्याने होते. घरातील सदस्य जे काही करत आहेत ते फक्त टीआरपीसाठी करत आहेत असे दोघांचे म्हणणे ठरते.
दरम्यान दिगंबरशी बोलताना शिवानी भावनिक होऊन, स्वतःच्या पूर्वीच्या हलाकीच्या परिस्थितीबद्दल, केलेल्या कष्टाबद्दल बोलते. दुसरीकडे एकांतात परत एकदा नेहा बिचुकले यांना सध्या घडत असलेल्या परिस्थितीबद्दल आणि त्यांच्या स्वभावाबद्दल समजावून सांगते व सुधारण्याचा सल्ला देते. एकीकडे हे चालले असताना दुसरीकडे बिग बॉसच्या घरात एक प्रेमकहाणी फुलत आहे. पराग आणि रुपाली जवळ येत आहेत हे सदस्यांच्या लक्षात आले आहे. दुपारी जेवताना, सर्वजण यावरून दोघांना चिडवतात.
आता घरात चर्चा सुरु झाली आहे ती कप्तानपदाची. माधव टीम फोडून किशोरीला कप्तानपदासाठी उभे राहण्याबद्दल आणि त्यांनतर माघार घेण्याबद्दल सुचवतो. माधवचा हा विचार न पटल्याने वीणा, किशोरी आणि रुपाली इतरवेळी आपण मैत्रिणी म्हणून राहू, मात्र टास्कमध्ये आपण आपापल्या टीमशी निष्ठावंत असूया असे वचन घेतात.
परागशी समाज जीवनाबद्दल बोलताना बिचुकले यांच्या मनातील दुःख बाहेर पडते. 'आजपर्यंत मला कोणी निवडून दिले नाही, जनतेने मला ओळखले नाही' या कारणामुळे बिचुकले ढसाढसा रडू लागतात. (इथे परत ते शिवानीकडे बोट करत आपल्या मुलीला तिच्यासारखे बनण्यास सांगतात. शिवानी इतके वाईट वागत असतानाही बिचुकले शिवानीला का इतके महत्व देत आहेत ते लक्षात येत नाही)
यावेळी कप्तानपदासाठी दोन्ही टीमला एकत्रित विचार करून दोन सदस्यांची नावे निवडायची आहेत. बिचुकले यांच्या टीममधील सर्व लोक नेहाचे नाव पुढे करतात. तर वैशालीच्या टीममधील लोक शिवची निवड करतात. नाव जाहीर करताना पराग थेट शिवचे नाव सांगतो, यावर टीममधील सदस्य चिडतात. परागने नाव जाहीर करण्यापूर्वी टीमशी बोलायला हवे होते असे सर्वांचे म्हणणे असते. पराग आधी जे वाक्ये बोलला आहे त्याचा राग अजूनही मुलींच्या मनात आहे, तो उफाळून येतो. अचानक सर्वजण परागच्या विरोधात उभे राहतात.
(या आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडणार नाही, त्यामुळे व्होटिंग लाइन्स बंद असणार आहेत)