तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) या तिशीतल्या अभिनेत्रींनी 'सांड की आँख' (Saand ki Aankh) या सिनेमात वयोवृद्ध स्त्रियांची भूमिका साकारली आणि त्यावरून बराच वादंग उठला. चित्रपटसृष्टीतुन त्यांच्यावर टीका करण्यात आली. नीना गुप्ता आणि सोनी राजदान यांनी ,'निदान आमच्या वयाच्या भूमिका तरी आम्हाला करून द्यायच्या' अशी टिप्पणी केली. पण आता अनुपम खेर (Anupam Kher) यांनी दोन्ही अभिनेत्रीची पाठराखण करत त्या दोघींवर टीका करणे हे चुकीचे असल्याचे विधान केले आहे. अनुपम खेर यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटात 'सारांश' मध्ये वयाच्या 28 व्या वर्षीच एका 65 वर्षाच्या व्यक्तीची भूमिका केली होती.
अनुपम खेर म्हणतात,''ही टीकाच चुकीची आहे. मला ह्यात कुठलंही तर्क दिसत नाही. कुठलीही आव्हानात्मक भूमिका स्वीकारणं आणि ती उत्तमरीत्या निभावणं हे कोणत्याही अभिनेत्याचं कर्तव्य आहे. मी विशीतला होतो जेव्हा मी एका 65 वर्षाच्या गृहस्थाची भूमिका केली होती. आणि लोकांना ती आवडलीसुद्धा होती. मग आता ह्या मुलींनी केली तर कुठे बिघडलं? आणि अभिनय करणाऱ्याला लोकं नावं कशी ठेवू शकतात? मी अद्यापही हा सिनेमा पाहिलेला नाही. पण मला या मुलींचा सार्थ अभिमान आहे.'' (हेही वाचा. भूमी पेडणेकर ठरली 'Face Of Asia'; बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मिळाला सन्मान)
नीना गुप्ता आणि सोनी राजदान विषयी बोलताना बोलताना अनुपम खेर म्हणतात,''दोघीही माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींसोबतही मी अनेक नाटकांत आणि अनेक चित्रपटात काम केले आहे. पण मी इथे त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी असा विचार करणे चुकीचे आहे. वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका फक्त त्या वयोगटाच्या व्यक्तीनेच करावी याला काय अर्थ आहे? मग तसं तर एडी मर्फीनेसुद्धा 'द नटी प्रोफेसर' मध्ये जाड व्यक्तीची भूमिका करायला नको होती.''
'सांड की आँख' हा सिनेमा 25 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. तिकीटबारीवर सिनेमा काही कमाल करून दाखवू शकला नसेल तरीही तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या कामाचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.