Pagalpanti चे दिग्दर्शक Anees Bazmee नी सांगितली संघर्षमय दिवसांची कहाणी; कितीतरी स्क्रिप्ट्सचे श्रेय न मिळाल्याचे केले उघड
Anees Bazmee | (Instagram)

प्रेक्षकांना हसवणं हे सर्वात कठीण कार्य आहे. उत्तम विनोद करणं हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. निखळ विनोद करणं मुश्किल झालं की मग सुरवात होते अंगविक्षेप आणि कमरेखालच्या विनोदांना. दुर्दैवाने आपल्याकडे विनोदी चित्रपटांना गंभीरपणे घेतलं जात नाही. उत्कृष्ट विनोदी चित्रपट देणारे बॉलीवूड मध्ये फार कमी जण आहेत. अनिस बाझमी त्या मोजक्या लोकांपैकी एक. 'नो एंट्री', 'वेलकम', 'सिंग इज किंग' सारखे दर्जेदार विनोदीपट देणारे अनिस बाझमी (Anees Bazmee) आता आपला 'पागलपंती' (Pagalpanti) हा नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या संघर्षमयी दिवसांबद्दल सांगितलं. ते म्हणतात,''मला कधीच सिनेमासृष्टीमध्ये यायची इच्छा नव्हती. कुठल्याही प्रकारचं काम करणं माझ्यासाठी महत्वाचं होतं आणि मला सुदैवाने या क्षेत्रात काम मिळालं. मला नेहमी वाटायचं की मी कधीही चांगला अभिनेता होऊ शकत नाही. माझा अभिनय वाईट होता म्हणून नाही तर मला त्यातून कधीही समाधान मिळाले नाही. आता जेव्हा मी त्या दिवंकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला असं वाटत की एका अर्थी मी सगळी क्षेत्र हाताळली ते बरंच झालं, ज्याचा फायदा मला आज होतोय." (हेही वाचा. Bhool Bhulaiyaa 2: भूल-भुलैय्या 2 फर्स्ट लूक प्रदर्शित, अक्षयकुमारची भूमिका साकारणार अभिनेता कार्तिक आर्यन)

अनिस बाझमी यांनी राज कपूर यांच्या कडे सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमांच्या लेखनाची धुरा सांभाळली. परंतु त्यांना त्या गोष्टीचं श्रेय कधीच दिलं गेलं नाही. त्याबद्दल सांगताना बाझमी म्हणतात,''कित्येक लेखनाची कामं मी अशीच श्रेयनामावली मध्ये माझं नाव येत नसताना देखील केली. पण त्याचा एका अर्थाने मला फायदाच झाला. प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर माझा विश्वास अजून दुणावत असे. नंतर मी अनेक सिनेमांच्या कथा लिहिल्या. स्वर्ग, गोपी किशन, दिवाना मस्ताना, आँखें आणि अजून बऱ्याच. सुरवातीचा काळ संघर्षाचा नक्कीच होता. पण नंतरचा माझा प्रवास अविस्मरणीय करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. आधी हे जर मी सोसलं नसतं तर कदाचत नंतर इतके चांगले विनोदी सिनेमे माझ्या हातून बनवले गेले नसते. कारण माझ्या मते विनोदाची पेरणी ही विषादातच होत असते."

'पागलपंती' हा त्यांचा आगामी सिनेमा 22 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. अनिल कपूर, जॉन अब्राहम, अर्शद वारसी सोबतच अनेक कलाकारांची फौज या सिनेमात पाहायला मिळणार आहे.