Tanhaji चित्रपटानंतर देशातील अन्य स्वातंत्र्य सैनिकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांची एक मालिकाच काढण्याची Ajay Devgn ची योजना
Ajay Devgn (Photo Credits: Instagram)

अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'तानाजी: द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. एकतर तानाजी मालुसरेंसारख्या छत्रपतींच्या एका मर्द मावळ्याची कथा हिंदी मध्ये मोठ्या पडद्यावर पाहण्याचं आकर्षण आणि दुसरं म्हणजे अजय देवगण, सैफ अली खान (Saif Ali Khan) सारखी तंगडी स्टारकास्ट. त्यामुळे ही अनुभवण्यासारखी कालकाकृती कधी येते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण अजय देवगणने त्यानंतरचे प्लॅन्स सुद्धा आधीच बनवून ठेवले आहेत. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अन्य स्वातंत्र्य सैनिकांच्या आयुष्याची साहसगाथा सांगणाऱ्या चित्रपटांची एक मालिकाच तयार करण्याचं अजय देवगणने ठरवले आहे.

तानाजी चित्रपटासाठी तयारी करत असताना तानाजी मालुसरेंबद्दल बरंच वाचन झाल्यानंतर अजयच्या डोक्यात हा विचार चमकून गेला. इतकंच नव्हे तर त्यानी काही नावांवरती शिक्कामोर्तबही करून ठेवले आहे. अजयला पूर्ण खात्री आहे की देशाच्या गौरवशाली इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा एक भाग असणाऱ्या या कथा प्रेक्षकांना आणि खासकरून आजच्या तरुणाईला नक्की आवडतील.

याबद्दल अजय म्हणतो,''तानाजी मालुसरेंच्या साऱ्या गाथा वाचताना मी खूपच प्रभावित झालो. अशा लढवय्यांनी, योध्यांनी स्वातंत्र्य संग्रामात दिलेलं योगदान पाहून मी प्रचंड मोहित झालो. या सर्व धाडसी पराक्रमाच्या, शौर्याच्या कथांपैकी काही कथा तरी मला मोठ्या पडद्यावर आणायच्या आहेत. तानाजी चित्रपटाच्या दरम्यानच ओम माझ्याकडे, काळाच्या ओघात मागे पडलेल्या इतर नायकांच्या कथा प्रेक्षकांसमोर आणण्याची, कल्पना घेऊन आला. खरेतर हे बीज त्याने पेरलं. पण आता हे पुढे नेलं पाहिजे.'' (हेही वाचा. तानाजींची शौर्य गाथा आता रुपेरी पडद्यावर; पाहा Tanhaji: The Unsung Warrior चा First Look)

'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित होतो आहे. ओम राऊत (Om Raut) या मराठमोळ्या मुलाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय देवगण तानाजी मालुसरेंच्या तर सैफ अली खान उदयभानचा भूमिकेत दिसणार आहेत.