Panipat च्या ट्रेलर मुळे सुरु झालाय नवा वाद; 'अब्दाली'च्या भूमिकेवरून अफगाणिस्तान झालंय चिंताग्रस्त
Panipat Film (Photo Credits: Instagram)

ऐतिहासिक चित्रपट आला की उपलब्ध ऐतिहासिक माहिती, त्याची पडताळणी आणि सत्यासत्यता हे मुद्दे जोर धरतातच. चित्रपट कुठल्या पुस्तकावरून घेतलाय, कोणत्या बखरीवरून घेतलाय वगैरे मुद्दे चर्चेचा विषय ठरू लागतात. मग तो ज्यावरून घेतलाय त्याच्या सत्यते बाबत चर्चा रंगतात. मग वाद, प्रतिवाद महाचर्चा, काही वेळा प्रदर्शने रंगल्यानंतर एकदाचा तो चित्रपट प्रदर्शित होतो. पानिपतचा ट्रेलर आला आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला कधी सुरवात होते याकडे सामान्य जनतेचं लक्ष लागून राहिलं. आता त्याची पहिली ठिणगी पेटली आहे ती थेट अफगाणिस्तानात इतकंच नाही, तर अफगाणिस्तानच्या दूतावासाने भारतीय माहिती आणि प्रसारण खात्याला या संदर्भात एक पत्र सुद्धा लिहिले आहे. या पत्रात 'गोवारीकरांच्या पानिपत मध्ये अब्दाली यांचे चुकीचे वर्णन केले गेल्यास अफगाणिस्तान मधील नागरिकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. ज्याचा परिणाम दोन्ही देशांतील संबंधावर होईल', अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.(हेही वाचा. Third Battle of Panipat: पानिपतच्या 3 ऱ्या लढाईपासून सुरु झाला मराठेशाहीचा ऱ्हास; जाणून घ्या या युद्धात का झाला मराठ्यांचा पराभव ?)

भारतामधील अफगाणिस्तानचे राजदूत शाईदा अब्दाली यांनी ट्विट करत म्हटले,''भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध मजबूत करण्यासाठी भारतीय चित्रपटांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. माझी अपेक्षा आहे की पानिपतने ही गोष्ट लक्षात ठेवली असेल."

1761 साली लढल्या गेलेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची कथा असलेला हा चित्रपट आता वाद रहित प्रदर्शित होतो की विवादांच्या भोवऱ्यात सापडतो हे बघणं औत्सुक्याचं आहे.