टेस्ला (Tesla) कारची देशात अनेक दिवसांपासून प्रतीक्षा आहे. भारतीय बाजारपेठ ज्या प्रकारे वाढत आहे, ते पाहता जवळपास प्रत्येक आघाडीचा ब्रँड टेस्लाच्या भारतामधील आगमनावर लक्ष ठेवून आहे. भारताचे वाहन क्षेत्रही वेगाने विद्युतीकरण होत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन कंपनी टेस्लालाही लवकरात लवकर भारतात यायचे आहे. अहवालानुसार, एलोन मस्क (Elon Musk) यांची टेस्ला कंपनी, पुढील महिन्यात होणाऱ्या 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट' दरम्यान गुजरातमध्ये इलेक्ट्रिक वाहन (EV) सप्लाय सिस्टम मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्थापन करण्याची घोषणा करू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्लाचे सीईओ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 10-12 जानेवारी रोजी होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमात ही घोषणा होण्याची शक्यता आहे. टेस्लाचा भारतामधील हा पहिला प्लांट असणार आहे.
अहमदाबाद मिररच्या वृत्तानुसार, गुजरात सरकारने सानंद, बेचराजी आणि ढोलेरा ही नावे टेस्लाला त्यांच्या उत्पादन प्रकल्पाच्या स्थापनेसाठी सुचवली आहेत. यापूर्वी टेस्ला गुजरातसह महाराष्ट्र आणि तामिळनाडूचा आपल इव्ही प्लांट उभारण्यासाठी विचार करत होता. मात्र आता गुजरात राज्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे अहवाल समोर येत आहेत. भारत या अमेरिकन ईव्ही कंपनीला पुढील वर्षापासून देशात इलेक्ट्रिक वाहने आयात करण्यास आणि दोन वर्षांच्या कालावधीत एक उत्पादन प्रकल्प उभारण्यास परवानगी देईल. (हेही वाचा: Cars Under 10 Lakh: देशात 10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'या' 5 नवीन गाड्या; 2024 मध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या सविस्तर)
याआधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नोव्हेंबरमध्ये टेस्लाच्या फ्रेमोंट, कॅलिफोर्निया येथील अत्याधुनिक उत्पादन सुविधेला भेट दिली होती. त्यावेळी गोयल म्हणाले होते, ‘प्रतिभावान भारतीय अभियंते आणि वित्त व्यावसायिकांना वरिष्ठ पदांवर काम करण्यासाठी आणणे आणि गतिशीलता बदलणे हा टेस्लाचा उल्लेखनीय प्रवास पाहून खूप आनंद झाला.’ याआधी जूनमध्ये अमेरिकेत एलोन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर आणि भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यास ते उत्सुक असल्याचे उघड केले होते.