अमेरिकेतील एक मुलगी जगात पाऊल ठेवताच जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये (Philadelphia) एका महिलेने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला, ज्याला जगातील पहिले 'टेस्ला बेबी' (Tesla Baby) संबोधले जात आहे. टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारच्या (Tesla Electric Car) पुढच्या सीटवर महिलेनी या बाळाचा जन्म दिला आहे. यावेळी कार ऑटोपायलटवर होती. या जोडप्याला घरापासून रुग्णालयात पोहोचण्यासाठी 20 मिनिटे लागणार होती आणि तोपर्यंत महिलेने कारमध्येच आपल्या मुलीला जन्म दिला.
पालक आपल्या तीन वर्षाच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना ही घटना घडली. फिलाडेल्फिया एन्क्वायररच्या वृत्तानुसार, कार ऑटोपायलटवर ठेवल्याने वडिलांना मागील सीटवर बसलेल्या आपल्या मुलावर लक्ष ठेवण्यास आणि त्याचवेळी पत्नीची काळजी घेण्यास मदत झाली. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी गाडीतच नाळ कापली. पाओली हॉस्पिटलच्या परिचारिकांनी नवजात बाळाला 'द टेस्ला बेबी' असे संबोधले.
टेस्ला यापूर्वी कारच्या सुरक्षेबाबत चर्चेत आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला टेस्ला कारच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालानुसार यावेळी ड्रायव्हिंग सीटवर कोणीही नव्हते. एक प्रवासी पुढच्या सीटवर होता, तर दुसरा मागच्या सीटवर होता. याशिवाय, दोन वर्षांपूर्वी टेल्सा सेडान अपघातात ठार झालेल्या युवकाच्या पालकांनी इलेक्ट्रिक कार कंपनीवर दावादेखील दाखल केला होता. त्यांचा आरोप होता की, इलेक्ट्रिक मॉडेल S च्या बॅटरी पॅकमध्ये दोष आहे आणि त्यामुळे मोठी आग लागू शकते. (हेही वाचा: पुण्यातील इलेक्ट्रिक वाहन सेल मॉडेलची राज्यभर प्रतिकृती तयार करावी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच वक्तव्य)
दरम्यान, इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला तिच्या नावीन्यपूर्ण आणि नवीन तंत्रज्ञानासाठी जगभरात ओळखली जाते. परंतु याआधी टेस्ला कारच्या एका नाराज आणि संतप्त ग्राहकाने 30 किलो डायनामाइट वापरून आपली टेस्ला कार पेटवून दिली होती. ही घटना फिनलंडच्या Kymenlaakso येथे घडली होती. या कारची किंमत सुमारे 50 लाख रुपये असल्याचे सांगितले जात होते.