National highway (Photo Credits: Wikipedia)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना त्यांच्या वाहनांच्या बाबतीत मोठा दिलासा दिला आहे. आता फिटनेस, रजिस्‍ट्रेशन सर्टिफिकेट (RC), मोटार वाहनाचे प्रदूषण संबंधी प्रमाणपत्र यांसारख्या मोटार वाहन कागदपत्रांची (Motor Vehicle Documents) वैधता, 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना वाहनासंबंधी मुदत संपणार्‍या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी बराच वेळ मिळेल. मोटार वाहनाशी संबंधित आपले कोणतेही दस्तऐवज कालबाह्य झाले असेल किंवा होणार असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. आता आपण 31 डिसेंबर 2020 पर्यंत त्यांचे नूतनीकरण करू शकता.

एवढेच नव्हे तर सरकारने आपल्या कालबाह्य ड्रायव्हिंग परवान्याची वैधता 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. याआधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लॉक डाऊनमध्ये आदेश काढला होता की, कालबाह्य ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, फिटनेस प्रमाणपत्र, परवानगी आणि इतर कागदपत्रांची वैधता 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. यानंतर, जूनपर्यंत परिस्थिती सुधारली नाही तर सरकारने पुन्हा हा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मंत्रालयाने एक आदेश जारी केला की कालबाह्य होणारी कागदपत्रे 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वैध मानली जातील. आता तिसऱ्यांदा सरकारने ही वैधता डिसेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. (हेही वाचा: Motor Insurance: वाहनाच्या Insurance साठी आता PUC असणे अत्यावश्यक, IRDA यांनी जाहीर केले आदेश)

केंद्र सरकारने कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्याही ठिकाणी कार्यालयात एकत्र न जमण्याच्या सूचना दिल्या आहेत. लॉकडाउन आणि कलम 144 अजूनही बर्‍याच ठिकाणी लागू आहेत. अशा परिस्थितीत कागदपत्रांचे नूतनीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी लोक कार्यालयात पोहोचू शकत नाहीत. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही तारीख वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की 1 फेब्रुवारी 2020 रोजी कालबाह्य होणारी किंवा आता 31 डिसेंबरपर्यंत कालबाह्य होणारी मोटार वाहन कागदपत्रे 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैध मानली जातील.