
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यशैलीचे सर्वजण कौतुक करत असतात. त्यांच्या मंत्रालयाद्वारे पूर्ण झालेल्या रस्ते, द्रुतगती मार्ग आणि उड्डाणपुलांच्या जाळ्यामुळे वाहतूक अधिक सुलभ झाली आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांबाबत केलेल्या घोषणेमुळे कार आणि दुचाकीस्वारांना दिलासा मिळाला होता. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पार्किंगची मोठी समस्या बनली आहे. म्हणूनच आता चुकीच्या पार्किंगबाबत लवकरच कायदा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
तसेच चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचे छायाचित्र पाठवणाऱ्या व्यक्तीला बक्षीसही मिळू शकते, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले. जर दंडाची रक्कम 1000 रुपये असेल तर छायाचित्र पाठवणाऱ्याला 500 रुपये मिळू शकतात, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने हा कायदा लागू केल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघात कमी होण्याची अपेक्षा आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा आणण्याचा विचार करत आहोत.
ते म्हणाले, ‘रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनाला एक हजार रुपये दंड होईल, असा कायदा मी आणणार आहे. त्याचवेळी चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचे छायाचित्र काढून पाठवणाऱ्याला 500 रुपये दिले जातील.’ लोक त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा तयार करत नाहीत, उलट त्यांची वाहने रस्त्यावर उभी करतात अशी खंत मंत्र्यांनी व्यक्त केली. (हेही वाचा: Free Ola Scooter Offer: 'हे' काम करा आणि मिळवा मोफत 'ओला स्कूटर'; जाणून घ्या काय आहे नेमकी ऑफर)
ते पुढे म्हणाले, ‘माझ्या नागपुरातील स्वयंपाकीकडेही दोन सेकंड-हँड वाहने आहेत... आता, चार जणांच्या कुटुंबाकडे सहा वाहने आहेत. असे दिसते की दिल्लीवासी भाग्यवान आहेत कारण आम्ही त्यांची वाहने उभी करण्यासाठी रस्ते तयार केले आहेत.’ दरम्यान, भारतीय मोटार वाहन कायदा 1932 अंतर्गत, केवळ एएसआय स्तरावरील अधिकारीच रहदारीच्या उल्लंघनासाठी तुमचे चलन कापू शकतो. एएसआय, एसआय, इन्स्पेक्टर यांना स्पॉट फाईन करण्याचा अधिकार आहे.