देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी ओलाने (Ola) त्यांची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर S1X EV लाँच केली आहे. यासोबतच चार नवीन बाइक्सही सादर करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे कंपनीने S1X EV गाडी अवघ्या 80,000 रुपयांच्या प्रास्ताविक किमतीत लॉन्च केली आहे. ओलाने आज ज्या चार इलेक्ट्रिक बाइक्सचे अनावरण केले आहे, त्या पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये लॉन्च केल्या जातील. ओलाने या कार्यक्रमात एकूण 8 उत्पादन आणि सॉफ्टवेअर अपडेट सादर केले आहेत.
Ola S1X मध्ये 6kW हब-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 2KWh आणि 3KWh बॅटरी पॅकच्या पर्यायामध्ये लॉन्च केली गेली आहे. याला 151 किमीची रेंज मिळते. ही स्कूटर ताशी 90 किलोमीटर इतक्या वेगाने वेग घेऊ शकते. S1X स्कूटर ही कंपनीच्या दोन विद्यमान उत्पादनांच्या डिझाइनमध्ये फार वेगळी नाही.
यात स्माइली-शेपचा ड्युअल-पॉड हेडलाइट, इंडिकेटर-माउंट फ्रंट ऍप्रॉन, रबराइज्ड मॅटसह फ्लॅट फूटबोर्ड आणि एलईडी टेललॅम्प मिळतील. यामध्ये 7-इंचाचा TFT टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील प्रदान केला आहे. ओलाच्या S1X स्कूटरच्या 2KWh प्रकारची किंमत 79,999 रुपये आहे. ओलाने 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत S1X इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करून बजेट सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. ही स्कूटर प्युअर ईव्ही, हिरो इलेक्ट्रिक, ओकिनावा, ओकाया आणि जॉय या सेगमेंटमधील इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.
यासह कंपनीने Ola S1 Pro ची अपडेटेड आवृत्ती 1,47,499 च्या किमतीत लॉन्च केली आहे. कंपनीने स्कूटरची कार्यक्षमता आणि श्रेणी वाढवली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही स्कूटर आता पूर्ण चार्ज केल्यावर 195 किमीची रेंज देईल, जी पूर्वी 181 किमी होती यात 11 kW ची मोटर आहे जी 4 kwh च्या बॅटरीला जोडलेली आहे. ही स्कूटर 2.6 सेकंदात 0 ते 40 किमीचा प्राप्त करू शकते आणि तिचा टॉप स्पीड 120 किमी प्रतितास आहे. कंपनी सप्टेंबर 2023 पासून या स्कूटरची डिलिव्हरी सुरू करेल. (हेही वाचा: Mercedes-Benz GLC SUV भारतात लॉन्च)
आज कंपनीने कंपनीने त्यांच्या 4 इलेक्ट्रिक बाइक्स- रोडस्टर, अॅडव्हेंचर, सुपरस्पोर्ट्स आणि एक क्रूझर सादर केल्या. या बाईक पुढच्या वर्षी लाँच केल्या जातील. या गाड्या एका चार्जमध्ये या बाईक 200 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापण्यास सक्षम असतील. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी MoveOS 4 सॉफ्टवेअर देखील अद्यतनित केले आहे. आता ओला मॅप कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये उपलब्ध असेल. यासोबत लोकेशन शेअरिंग आणि फाइंड माय स्कूटर यासारखे फीचर्स अॅपद्वारे उपलब्ध होणार आहेत.