Ola (PC-Facebook)

Ola Layoffs: देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहन कंपनी ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) आयपीओपूर्वी टाळेबंदीच्या तयारीत आहे. खर्चाचा बोजा कमी करून नफा मिळवण्याची कंपनीची योजना आहे. त्यामुळे कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अहवालानुसार, ओला इलेक्ट्रिकमध्ये 400 ते 500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाऊ शकते. कंपनी आपले कामकाज सुरळीत करण्यासाठी नोकर कपात योजनांवर काम करत आहे.

अहवालातील सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे की, या छाटणीमुळे प्रभावित कर्मचाऱ्यांची संख्या येत्या काही दिवसांत बदलू शकते, कारण कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन अजूनही छाटणीच्या प्रमाणात विचार करत आहे. ओला इलेक्ट्रिकमधील टाळेबंदीमुळे कोणते कर्मचारी प्रभावित होणार आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु अनेक वर्टिकलच्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

कंपनी जुन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकते आणि काहींच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकते. जास्त पगार असलेल्या जुन्या कर्मचाऱ्यांच्या जागी कमी पगारावर नवीन कर्मचारी आणल्याने कंपनीला खर्च कमी करण्यास मदत होईल. ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाईल, त्या तुलनेत कमी कर्मचाऱ्यांना कामावर घेतले जाईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. याचा अर्थ ओला इलेक्ट्रिकचे एकूण हेडकाउंट कमी होणे निश्चित आहे. ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल यांना प्रस्तावित आईपीओपूर्वी कंपनीला नफा मिळवून द्यायचा आहे. (हेही वाचा: Tesla Layoffs: टेस्लामध्ये पुन्हा कर्मचारी कपात; इंजिनीयर, सॉफ्टवेअर आणि सेवा विभागांमधील कर्मचारी गमावणार नोकरी)

एप्रिलमध्ये ओला कॅबने सुमारे 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. दरम्यान, ओला इलेक्ट्रिकने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बाजार नियामक सेबीकडे आयपीओसाठी मसुदा दाखल केला होता. त्यावेळी कंपनीने मसुद्यात सांगितले होते की, ऑक्टोबर 2023 पर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 3,733 होती. आयपीओ लाँच करून गुंतवणूकदारांकडून 5,500 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.