6 Airbags Mandatory Rule: कारमध्ये सहा एअरबॅग नियम अनिवार्य करणार नाही- नितीन गडकरी
Nitin Gadkari | (Photo credit: archived, edited, representative image)

Nitin Gadkari On 6 Airbags Mandatory Rule: केंद्र सरकारने रस्ते वाहतुकीसंदर्भात या वर्षाच्या सुरुवातीलाच नवी क्रॅश चाचणी नियम ( New Crash Test Rules) लागू केला आहे. त्यामुळे सरकार भारतातील प्रवासी कारसाठी सहा-एअरबॅग सुरक्षा नियम अनिवार्य करणार नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (13 सप्टेंबर) म्हटले आहे. वाहनांची धडक होते तेव्हा चालक आणि वाहनाच्या डॅशबोर्डमध्ये एअरबॅग्ज मोठा अडथळा निर्माण करते. परिणामी मोठा अपघात असला तरी चालकाचे आणि पहिल्या सीटवर बसलेल्या व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत होते.

ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया येथे नितीन गडकरी बोलत होते, ते म्हणाले की, म्ही बीएनसीएपी (भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम) प्रणाली सादर केली आहे. जी कारमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त करण्यासाठी सहा एअरबॅग्जची मागणी करते. यामुळे कंपन्यांना 6 एअरबॅग्ज अनिवार्य न करता आपोआप मानक म्हणून ऑफर करण्यास प्रवृत्त करेल.

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करायचे असेल तर आपण नियमांचे पालन करायला पाहिजे असे सांगत गडकरी म्हणाले, मानवी वर्तनातील बदल हा अपघातांचे प्रमाण कमी करण्यातील सर्वात मोठा घटक आहे. खरं म्हणजे वाहन हाकताना हेल्मेटचा कमी वापर, झेब्रा क्रॉसिंग आणि मद्यपान करून वाहन चालवणे या गोष्टी थांबल्या पाहिजेत. नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की, 1 ऑक्टोबर 2023 पासून सर्व प्रवासी गाड्यांना किमान सहा एअरबॅग असणे बंधनकारक केले जाईल. मात्र, हा प्रस्ताव अंतिम न झाल्याने आता तो अनिवार्य करण्याची गरज नसल्याचे गडकरींना वाटत आहे.

नवी दिल्लीतील ऑटोमोटिव्ह कॉन्फरन्समध्ये बोलताना गडकरी म्हणाले, आता लोक सावध झाले आहेत. ज्या मॉडेल्समध्ये सहा एअर बॅग असतील ती कार घेण्यास लोक प्राधान्य देतात. स्वयंचलित ड्रायव्हर परवाना प्रणाली रस्ते सुरक्षेसाठी मोठे सक्षम बनणार आहेत. ऑटोमेकर्सनी स्क्रॅपेज सेंटर्स, फिटनेस आणि ड्रायव्हिंग ट्रेनिंग आणि परवाना केंद्रे सुरू केली पाहिजेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, पाठिमागील वर्षी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी म्हटले होते की, मुख्यतः निम्न मध्यमवर्गीय लोकांकडून प्रामुख्याने छोट्या कार खरेदी केल्या जातात. त्यामुळे या कारमध्ये पुरेशा प्रमाणात एअरबॅग्ज देखील असायला हव्यात. खरं म्हणजे ऑटोमेकर्स केवळ श्रीमंत लोकांनी विकत घेतलेल्या मोठ्या कारमध्येच आठ एअरबॅग का देतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.