चोवीस तासात 100 कोटी जमा करा, फॉक्सवॅगन कंपनीला एनजीटीचा दणका
Volkswagen | (Photo courtesy: archived, edited, representative image)

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (National Green Tribunal) ने ऑटोविश्वातील बलाड्य कंपनी फॉक्सवॅगनला जोरदार दणका दिला आहे. एनजीटीने दिलेल्या आदेशानुसार फॉक्सवॅगनला येत्या 24 तासांत म्हणजेच शुक्रवार (18 जानेवारी) सायंकाळी 5 वाजेपर्यंत 100 रुपये जमा करावे लागणार आहेत. फॉक्सवॅगनला ही रक्कम दंड रुपात भरावी लागणार आहे. जर्मन कंपनी फॉक्सवॅगन (Volkswagen) हिचे उत्पादन असलेल्या अनेक गाड्या (Four-wheelers) या पर्यावरणस्नेही नाहीत. तसेच त्या मोठ्या प्रमाणावर प्रदुषण करतात याबाबतच्या प्रकरणात एनजीटीने फॉक्सवॅगन कंपनीला गुरुवारी हा दंड ठोठावला.

दरम्यान, निर्धारीत वेळेत दंड भरला नाही तर फॉक्सवॅगनवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच, कंपनीच्या भारतीय प्रमुखांना अटक करण्यात येईल. इतकेच नव्हे तर, कंपनीची भारतात उपलब्ध असलेली संपत्तीही जप्त करण्यात येईल, असा सक्त इशारा कंपनीला देण्यात आला आहे. फॉक्सवॅगनला दंड स्वरुपातील ही रक्कम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (Central Pollution Control Board) यांच्याकडे जमा करायची आहे.

एनजीटीने फॉक्सवॅगन कंपनीला गेल्या वर्षी 16 नोव्हेंबरलाच ही रक्कम जमा करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, कंपनीने आदेशाचे पालन न करता ही रक्कम भरली नव्हती. त्यामुळे एनजीटीला पुन्हा एकदा आदेश देत कडक कारवाई करण्याचा इशारा द्यावा लागला. फॉक्सवॅगनच्या डीझेलवर चालणाऱ्या अनेक कारमुळे 2016मध्ये नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर झाले. मात्र, कंपनीने चलाखी करत एका सॉफ्टवेयरच्या माध्यमातून प्रदुषणाचा स्तर मुद्दाम कमी दाखवला. (हेही वाचा, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने Volkswagen ला ठोठावला 100 कोटींचा दंड)

एनजीटीने नोव्हेंरमध्येच 4 सदस्यांची एक समिती नेमली होती. फॉक्सवॅगन कंपनीच्या गाड्यांनी पर्यावरणाचे किती नुकासान केले याचा तपास करण्याची जबाबदारी या कमीटीवर होती. या समितीचा अहवाल मंगळवारी पुढे आला. या अहवालात फॉक्सवॅगन कंपनीला 171.34 कोटी रुपयांचा दंड ठोठवावा अशी शिफारस करण्यात आली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, फॉक्सवॅगन कंपनीच्या गाड्यांमुळे 2016 मध्ये राजधानी दिल्लीत सुमारे 48.678 टन नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन झाले.