Cyrus Mistry | File image)

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे पालघरजवळ रविवारी दुपारी झालेल्या अपघातात निधन झाले. यावेळी ते मर्सिडीज जीएलसी एसयुव्ही (Mercedes GLC SUV) मधून प्रवास करत होते. सोमवारी रात्री जेजे रुग्णालयाकडून सायरस मिस्त्री यांचा पोस्टमॉर्टम अहवाल त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला. यामध्ये नमूद केले आहे की, त्यांचा मृत्यू पॉलीट्रॉमा- महत्वाच्या अवयवांना झालेल्या मोठ्या दुखापतीमुळे झाला आहे. आता कारमधील काही बिघाडामुळे तर हा अपघात झाला नाही ना हे पाहण्यासाठी मर्सिडीज कार कंपनीच्या तज्ञांची एक टीम देखील या अपघाताची तपासणी करेल.

सायरस मिस्त्री अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येत होते. यावेळी मुंबईतील स्त्रीरोग तज्ज्ञ अनाहिता पंडोल कार चालवत होत्या. भरधाव वेगात दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना त्यांचे नियंत्रण सुटले आणि कार पालघर येथील चारोटी जवळील सूर्या नदीच्या पुलावरील रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये मागील आसनावर बसलेले मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये मरण पावलेल्या सायरस मिस्री आणि त्यांच्या सोबतच्या प्रवाशांनी सीट बेल्ट बांधला नव्हता.

सध्या अनाहिता आणि तिचे पती दारियस यांना सोमवारी सकाळी विशेष ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुढील उपचारासाठी गिरगाव येथील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एका वरिष्ठ महामार्ग पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘प्राथमिक तपासानुसार, वेग आणि निर्णयातील त्रुटीमुळे हा अपघात झाला. दोन्ही मृतांनी सीट बेल्ट घातला नव्हता. दापचरी चेकपोस्टवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की, कारने दुपारी 2.12 वाजता हे चेकपोस्ट ओलांडले आणि अपघात मुंबईच्या दिशेने सुमारे 20 किमी पुढे झाला.’ (हेही वाचा: मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला एका कारची जोरदार धडक, अपघातात 2 व्यक्ती ठार)

माजी एडीजीपी महाराष्ट्र हायवे पोळी, आरके पद्मनाभन यांच्या मते, लेन कटिंग हे बहुतांश रस्ते अपघातांचे सामान्य कारण आहे. दरम्यान, मर्सिडीजच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सायरस मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर यांचा अपघातात मृत्यू झालेल्या घटनास्थळी भेट दिली आणि ते प्रवास करत असलेल्या कारची पाहणी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, ‘जसे विमानात ब्लॅकबॉक्स असतो, त्याचप्रमाणे या मर्सिडीज कारमध्ये एक चिप असते जी वेगाचा तपशील देऊ शकते आणि अपघाताबाबत महत्त्वाची माहिती देऊ शकते. कारची तपासणी करणार्‍या मर्सिडीज पथक याबाबतचा अहवाल देणार आहेत.’