Cheapest Electric Car: भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च; पूर्ण चार्ज केल्यावर धावेल 200 किमी, जाणून घ्या किंमत
PMV Micro Electric Car (संग्रहित संपादित प्रतिमा)

इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी पीएमव्ही इलेक्ट्रिकने (PMV Electric) ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. या कारचे नाव PMV EaS-E असून, ती एक मायक्रो-इलेक्ट्रिक कार आहे. महत्वाचे म्हणजे ही, भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने त्याची किंमत 4.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. ही किंमत सुरुवातीच्या 10 हजार ग्राहकांसाठी असेल. लॉन्च होण्यापूर्वीच या वाहनाला 6000 बुकिंग मिळाले आहेत. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरून हे वाहन बुक करू शकतात.

सर्वात स्वस्त असण्यासोबतच ही देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार देखील आहे. PMV Eas-E इलेक्ट्रिक कार पूर्ण चार्ज केल्यावर 200 किमी पर्यंतची रेंज देते. तिचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे. PMV Eas-E इलेक्ट्रिक स्मार्ट कार मोबाईल फोनद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते. कारला IP67 रेटिंगसह 10 Kwh लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी पॅक मिळतो. इलेक्ट्रिक कार PMSM इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाईल जी 10kw पॉवर आणि 500 ​​Nm टॉर्क निर्माण करते.

PMV चा दावा आहे की Eas-E इलेक्ट्रिक कारची ऑपरेटिंग किंमत 75 पैसे/किमी पेक्षा कमी आहे. या इलेक्ट्रिक कारला क्रूझ कंट्रोल, रिमोट पार्किंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑन-बोर्ड नेव्हिगेशनसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. इलेक्ट्रिक कारचे कर्ब वजन सुमारे 550 किलो असेल. बॅटरी चार्जिंगच्या वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, या कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतात. ही कार कोणत्याही 15A आउटलेटद्वारे चार्ज केली जाऊ शकते. कंपनीकडून या कारसोबत 3 kW चा AC चार्जर दिला जात आहे. (हेही वाचा: ओला स्कूटर घोटाळ्याचा पर्दाफाश; 20 जणांना अटक, देशभरात 1000 हून अधिक लोकांची फसवणूक)

स्मार्ट कारच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करण्यात आली नसल्याचा कंपनीचा दावा आहे. या स्मार्ट इलेक्ट्रिक कारबद्दल माहिती देताना, PMV इलेक्ट्रिकचे संस्थापक, कल्पित पटेल म्हणाले, ‘आम्ही देशाचे विद्युतीकरण करण्याची आकांक्षा बाळगतो आणि म्हणूनच आम्ही एक पूर्णपणे नवीन सेगमेंट सादर करणार आहोत ज्याचे नाव पर्सनल मोबिलिटी व्हेईकल असेल. ही कार रोजच्या वापरासाठी बनवण्यात आली आहे.’