टाटाने 2008 साली सामान्यांच्या खिशाला परवडणारी, आकाराने लहान अशी नॅनो कार बाजारात आणली होती. त्यावेळी 1 लाखाला उपलब्ध असणारी ही गाडी अनेकांनी खरेदी केली होती. मात्र हळूहळू या गाडीची क्रेझ कमी झाली, शेवटी 2018 मध्ये या गाडीचे उत्पादन थांबवण्यात आले. आता परत एकदा नॅनो पेक्षाही छोटी गाडी बाजारात आली आहे. बजाज ऑटोने (Bajaj Auto) भारतातील सर्वात छोटी गाडी, Qute सादर केली आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने या गाडीला रस्त्यावर धावण्यासाठी परवानगी दिली आहे.
मुळात ही गाडी इतकी छोटी आहे की, हिला कारऐवजी रिक्षाच म्हणणे ठीक असेल. मात्र गाडीला स्टीयरिंग व्हील आणि चार चाके आहेत. यामध्ये ड्रायव्हरसह पॅसेंजर सीट देखील देण्यात आली आहे. चालक समवेत एकूण चार लोक या गाडीत बसू शकतात. सर्व प्रवाश्यांसाठी सीट बेल्ट देखील पुरविण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे ही कार पेट्रोलसह सीएनजी व्हेरिअंटमध्येही उपलब्ध आहे.
पेट्रोल मोडमध्ये ही गाडी 13 पीएस पॉवर आणि 18.9 एनएम क्षमतेचा टॉर्क जनरेट करेल. तर सीएनजी मोडमध्ये ही गाडी 10.98 पीएस पॉवर आणि 16.1 एनएम टॉर्क जनरेट करेल. या गाडीची लांबी 2,752 मिमी असेल, आणि वजन 451 एनएम असेल. या गाडीची किंमत 2.48 लाख पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिअंटसाठी 2.78 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. (हेही वाचा: चीनने लॉंंच केली एकदा चार्ज केल्यावर तब्बल 312 किलोमीटर धावणारी इलेक्ट्रिक कार)
या कारमध्ये 216 सीसीचे सिंगल सिलिंडर ट्विन स्पार्क DTSi इंजिन दिले आहे. हे इंजिन 5,500rpm वर 13 बीएचपी पाॅवर जनरेट करते. Quteचा टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रति तास आहे. इंजिन छोटे असल्यामुळे Qute 35 किलोमीटर प्रति लीटर अॅव्हरेज देईल. याआधी ही गाडी केरळ, राजस्थान, ओडिशा, गुजरात आणि उत्तर प्रदेश इथे सादर करण्यात आली. महाराष्ट्रात ही कार आज (18 एप्रिल) लाँच झाली.