चीनने लॉंंच केली एकदा चार्ज केल्यावर तब्बल 312 किलोमीटर धावणारी इलेक्ट्रिक कार
ओरा आर 1 (Photo Credit : Youtube)

सध्या प्रदूषणाची समस्या प्रचंड वाढत आहे, त्यात गाड्यांच्या धुरामुळे अजूनच भर पडत आहे. गाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंधनांच्या किमतीनेही कळस गाठला आहे. या गोष्टी पाहता सध्या मोठ मोठी राष्ट्रे एकोफ्रेंडली गाड्यांवर भर देताना दिसून येत आहेत. म्हणूनच सीएनजी आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांची मागणी वाढत आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक गाड्यांची (Electric Car) किमतीही जास्त असल्याने सर्वसामान्य जनतेला त्या परवडू शकत नाही. मात्र इलेक्ट्रॉनिक विश्वात क्रांती घडवणाऱ्या चीनमधील लोकप्रिय कंपनी ग्रेल वॉल (Great Wall) मोटरने नुकतीच एक स्वस्त इलेक्ट्रिक व्हेहिकल सादर केली आहे. या इलेक्ट्रिक कारला ओरा आर 1 (ORA R1) असे नाव देण्यात आले आहे. या गाडीची किंमत 8680 डॉलर म्हणजेच जवळपास 6.05 लाख रुपये आहे.

या स्वस्त इलेक्ट्रिक कारमध्ये टेस्ला ऑटोपायलट किंवा त्याच्यासारखे इतर इलेक्ट्रिक कारमध्ये असतात तसे  फीचर नाहीत परंतु ही कार तिच्या लूकमुळे लोकांना आकर्षित करून घेत आहे. या ओरा आर 1 इलेक्ट्रिक कारला स्टील फ्रेमवर तयार केले आहे, ज्यामध्ये शानदार कर्व्ह आणि मोठे-राउंड हेडलँप देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये कंपनीने 35 किलोवॅटची बॅटरी वापरली आहे. (हेही वाचा: यामाहाने लॉन्च केली तब्बल 10.55 लाखांची बाईक; जाणून घ्या काय आहेत फीचर्स)

कंपनीचे म्हणणे आहे की, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर, ती तब्बल 312 कि.मी. धावू शकते. या नवीन इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंस सिस्टम दिला आहे, ज्यामुळे 'हॅलो, ओरा' असे बोलल्यावरच ही कार स्वयंचलितपणे सुरू होते. सध्या ही कार फक्त चीनच्याच बाजारपेठेत उपलब्ध आहे. भारत सरकारद्वारे विद्युत व्हेहिकलच्या वापरला देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनामुळे लवकरच ही गाडी भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होईल.