![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/corruption-2.jpg?width=380&height=214)
Corruption Perceptions Index: भ्रष्टाचार (Corruption) ही अनेक देशांमध्ये एक गंभीर समस्या आहे. ती अर्थव्यवस्था कमकुवत करते, सरकारांना हानी पोहोचवते तसेच नागरिकांच्या हक्कांवर परिणाम करते. आता ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने मंगळवारी भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) 2024 रँकिंग जाहीर केले. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक जगातील सर्वात भ्रष्ट आणि सर्वात प्रामाणिक देशांची यादी देतो. यादी जाहीर करण्यासाठी, सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या पातळीच्या आधारे सीपीआय 180 देश आणि प्रदेशांची क्रमवारी लावते. देशांना 0 ते 100 च्या प्रमाणात गुण दिले जातात, ज्यामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा देश सर्वात प्रामाणिक तर, सर्वात कमी गुण मिळवणारा देश सर्वात भ्रष्ट घोषित केला जातो.
हा अहवाल ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बर्लिनने प्रसिद्ध केला आहे. सीपीआय अहवालानुसार, जागतिक भ्रष्टाचाराची पातळी चिंताजनकपणे उच्च आहे. या अहवालात जगभरातील गंभीर भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. दोन तृतीयांश पेक्षा जास्त देशांना 100 पैकी 50 पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. अंदाजे 6.8 अब्ज लोक अशा देशांमध्ये राहतात ज्यांचा सीपीआय स्कोअर 50 पेक्षा कमी आहे, जो जगातील एकूण लोकसंख्येच्या 85 टक्के आहे.
यादीत समाविष्ट असलेले सर्वात प्रामाणिक देश-
सलग सातव्या वर्षी सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या यादीत डेन्मार्कने 90 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर फिनलंड (88) आणि सिंगापूर (84) यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर न्यूझीलंड (83), लक्झेंबर्ग, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड (81) यांचा क्रमांक लागतो. पुढे स्वीडन (80), नेदरलँड्स (78) व ऑस्ट्रेलिया (77) आहेत. (हेही वाचा: Gold Price Today: सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! प्रति 10 ग्रॅम 87,210 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला दर)
सर्वात भ्रष्ट देश-
जगातील सर्वात भ्रष्ट देशांच्या यादीत दक्षिण सुदान अव्वल स्थानावर आहे. निर्देशांकानुसार, त्याला 8 गुण मिळाले आहेत आणि त्याला सर्वात कमी 180 क्रमांक देण्यात आला आहे. यानंतर, सोमालिया 179 व्या स्थानावर आहे आणि व्हेनेझुएला 178 व्या स्थानावर आहे. या यादीत सीरिया 177 व्या क्रमांकावर आहे आणि येमेन, लिबिया, इरिट्रिया आणि इक्वेटोरियल गिनी 13 गुणांसह 173 व्या क्रमांकावर आहेत. निकाराग्वा 14 गुणांसह 172 व्या क्रमांकावर आहे. अफगानिस्तान 17 गुणांसह 165 व्या क्रमांकावर आहे.
भारत आणि पाकिस्तानचे रँकिंग-
या यादीत गरीब पाकिस्तान 135 व्या क्रमांकावर आहे. 2023 च्या तुलनेत पाकिस्तानची दोन अंकांनी घसरण झाली आहे. अवघे 27 ण मिळवणारा पाकिस्तान या क्रमवारीत माली, लायबेरिया आणि गॅबॉन सारख्या देशांसोबत आहे. भ्रष्टाचार निर्देशांकात भारताचे स्थान पाकिस्तानपेक्षा खूपच वरचे आहे. मात्र, 2023 च्या तुलनेत त्यात 1 गुणांची घसरण झाली आहे. 2024 क्रमवारीत भारत 38 गुणांसह 96 व्या क्रमांकावर आहे. भारताचा आणखी एक शेजारी देश चीन 42 गुणांसह या क्रमवारीत 76 व्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, 2024 च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात असे दिसून आले आहे की, भ्रष्टाचार हा अजूनही अनेक देशांमध्ये एक मोठा मुद्दा आहे. बहुतेक देशांमध्ये सुधारणा झालेली नाही आणि भ्रष्टाचार विकासाला मंदावत आहे. भारत पाकिस्तानपेक्षा चांगला आहे, परंतु त्याचा भ्रष्टाचाराचा स्कोअर घसरला आहे, जो चांगले कायदे आणि कडक अंमलबजावणीची आवश्यकता दर्शवितो.