World Happiness Report 2021: जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत सलग चौथ्यांदा Finland ठरला अव्वल, भारताला मिळाले 139 वे स्थान; जाणून घ्या Top 20 यादी 
Finland People| प्रातिनिधिक प्रतिमा| संग्रहित संपादित प्रतिमा

सध्याच्या कोरोना विषाणू काळात जवळजवळ सर्वच देशांचे कंबरडे मोडले आहे. गेले एक वर्ष अनेक देश अनेक संकटांचा सामना करीत आहेत. आता युनायटेड नेशन्सच्या (UN) एका अहवालात शुक्रवारी म्हटले आहे की, ‘सलग चौथ्या वर्षी व यंदा कोरोनाची साथ असूनही फिनलँड (Finland) हा जगातील सर्वात सुखी देश (World Happiness Report 2021) ठरला आहे. वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, संशोधक म्हणाले की लोकांचा विश्वास जिंकण्यात फिनलँड नेहमीच यशस्वी ठरला आहे. साथीच्या रोगादरम्यान लोकांचे जीवनमान रुळावर आणण्यासाठी देशाने मोठी मदत केली आहे.

या सर्वेक्षणात 149 देशांचा समावेश होता. देशाचा जीडीपी, सामाजिक सुरक्षा, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचाराच्या निकषांवर लोकांना प्रश्न विचारून 'हॅपीनेस स्कोअर' काढला गेला. यामध्ये मागील तीन वर्षांचा सरासरी डेटा घेतला जातो. हा अहवाल गेल्या 9 वर्षांपासून प्रसिद्ध केला जात आहे. या यादीमध्ये पुन्हा युरोपियन देशांचे वर्चस्व आहे आणि फिनलँडनंतर डेन्मार्क दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यानंतर स्वित्झर्लंड, आइसलँड आणि नेदरलँड्स आहेत. न्यूझीलंड यावेळी 9 व्या स्थानावर आहे. टॉप टेनमध्ये हा एकमेव गैर युरोपियन देश आहे.

जर्मनीच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून तो 17 व्या स्थानावरुन 13 व्या स्थानावर आला आहे. फ्रान्स 21 व्या स्थानी आला आहे. ब्रिटन मात्र 13 व्या स्थानावरून 17 व्या स्थानी गेला आहे, तर अमेरिका 19 व्या क्रमांकावर आहे. भारताबद्दल बोलायचे तर भारत या यादीमध्ये 139 व्या स्थानावर आहे.

जगातील सर्वात आनंदी Top 20 देश –

फिनलँड, डेमार्क, स्वित्झर्लंड, आईसलँड, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन, लक्झेंबर्ग, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, इस्त्राईल, जर्मनी, कॅनडा, आयर्लंड, कोस्टा रिका, युनायटेड किंगडम, झेक प्रजासत्ताक, युनायटेड स्टेट्स, बेल्जियम (हेही वाचा: Signal App: फेसबुक, गुगल आणि ट्विटरनंतर आता China मध्ये सिग्नल अ‍ॅपवर बंदी; जाणून घ्या कारण)

वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2021 क्रमवारीत भारताच्या मागे असलेल्या दहा देशांमध्ये बुरुंडी, येमेन, टांझानिया, हैती, मलावी, लेसोथो, बोत्सवाना, रवांडा, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान आहेत.