Signal App: फेसबुक, गुगल आणि ट्विटरनंतर आता China मध्ये सिग्नल अ‍ॅपवर बंदी; जाणून घ्या कारण 
Signal (Photo Credits: Google Play Store)

सध्या अनेक देशांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपला सिग्नल अ‍ॅपद्वारे (Signal App) मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. चीनमध्ये (China) हे अ‍ॅप अनेक लोक वापरत होते, परंतु आता एनक्रिप्टेड मेसेजिंग अॅप सिग्नल चीनमध्ये बंद करण्यात आले आहे. आता हे अ‍ॅप केवळ व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) वर वापरले जाऊ शकते. यापूर्वी चीनने बरेच मेसेजिंग अॅप्स, सोशल मिडिया बंद केले आहेत. यामध्ये फेसबुक, ट्वीटर आणि गुगलचाही समावेश आहे. चीनमधील सिग्नल अ‍ॅप वापरकर्त्यांनी सोमवारी संध्याकाळी मेसेजेस पाठविणे आणि प्राप्त करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले होते.

सिग्नल हे चीनमधील काही उर्वरित मेसेजिंग अॅप्सपैकी एक होते जे लोकांना एनक्रिप्टेड मेसेजेसची देवाणघेवाण करण्यास परवानगी देत होते. म्हणजे कंपनी किंवा बाहेरील व्यक्ती सिग्नल अ‍ॅपवरील संभाषण वाचू शकत नव्हती. अशा परिस्थितीत चीन संस्थान सिग्नल अ‍ॅपवरील संभाषणाचा मागोवा घेण्यास सक्षम नव्हते, यामुळे सरकारने सिग्नल अ‍ॅप बंद केले आहे. हा अ‍ॅप अलीकडेच चीनमध्ये लोकप्रिय झाला होता, परंतु 'वीचॅट' मेसेजिंग अॅपच्या वापरकर्त्यांपेक्षा हे वापरणार्‍या वापरकर्त्यांची संख्या खूपच कमी होती. सिग्नल अ‍ॅप अद्याप चीनमधील अ‍ॅपल स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. परंतु या सिग्नल अ‍ॅपद्वारे चीनमध्ये संदेश पाठविला जाऊ शकत नाही. (हेही वाचा: Alert! तुम्ही सुद्धा Google Incognito मोडचा वापर करत असाल तर व्हा सावध)

सिग्नल अ‍ॅपवर बंदी आणण्याबाबत चीनी अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. व्हीपीएन आणि व्हर्च्युअल नेटवर्क हे वापरकर्त्यांच्या खाजगी आणि संवेदनशील माहितीचे संरक्षण करतात. हे संभाषण जगातील सर्व्हरशी कनेक्ट होत नाही. दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी मंगळवारी आपल्या नियमित पत्रकार परिषदेत सांगितले की, चीनमध्ये सिग्नलवर घातल्या गेलेल्या बंदीबाबत त्यांना माहिती नाही. दुसरीकडे सिग्नलकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या, चीनमध्ये टेंन्सेंटचे मेसेजिंग अॅप वीचॅट वापरकर्त्यांची संख्या सर्वात जास्त आहे.