जगातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत व्हिएन्ना अग्रस्थानी;  दिल्ली, मुंबईला पहिल्या 100 मध्येही स्थान नाही, कराची शेवटच्या 10 मध्ये
Vienna (Photo Credit : Flickr)

Liveable Cities In World: 2019 च्या इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट रँकिंगमध्ये (2019 Economist Intelligence Unit Ranking) सलग दुसर्‍या वर्षी राहण्यासाठी योग्य म्हणून व्हिएन्ना (Vienna) शहराची निवड झाली आहे. त्यानंतर ऑस्ट्रिलीयाची (Australia) राजधानी मेलबर्नचा (Melbourne) नंबर लागतो. याबाबत फ्रान्स प्रेस आणि रॉयटर्सने वृत्त दिले आहे. ‘यलो व्हेस्ट्स’ चळवळीच्या निषेधांमुळे पॅरिसने या यादीमधील आपले स्थान गमावले आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर राजधानी दिल्लीचे (New Delhi) स्थान सहा अंकांनी घसरून राहण्यायोग्य शहरांमध्ये दिल्ली सध्या 118 क्रमांकावर आहे. प्रदूषण आणि गुन्हेगारी यांमुळे दिल्लीच्या क्रमवारीत बराच फरक पडला असल्याचे जाणवते.

व्हिएन्नाने देशाचे शास्त्रीय संगीत, मैफिली आणि त्यांच्या साम्राज्याचा इतिहास यांमुळे पर्यटकांना फार मोठ्या प्रमाणात आकर्षित केले आहे. तसेच देशातील भरपूर हिरव्यागार जागा, उत्कृष्ट सार्वजनिक सेवा आणि सुरक्षित वातावरण या काही गोष्टींमुळे व्हिएन्नाने पहिला नंबर पटकावला आहे. यामुळेच गेल्या वर्षी सात वर्षांपासून पहिल्या स्थानावर असलेल्या मेलबर्नलाही त्याने मागे टाकले आहे.

दोन शहरांमधील फरक अतिशय कमी आहे - 100 पैकी 0.7 गुण. व्हिएन्नाला मागील वर्षीप्रमाणेच 2019 च्या क्रमवारीत 99.1 गुण प्राप्त झाले. मेलबर्नने 98.4 गुण आणि सिडनीने 91.1 गुण मिळवले आहेत. या यादीमधील पहिल्या दहा शहरांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाचे वर्चस्व आहे. दोन्ही देशातील प्रत्येकी 3 शहरांना या यादीमध्ये स्थान मिळाले आहे. टोकियो आणि ओसाकासमवेत जपान देखील या यादीमध्ये आहे. (हेही वाचा: World’s Safest City: टोकियो ठरले जगातील सर्वात सुरक्षित शहर, कराची शेवटच्या पाचमध्ये; जाणून घ्या दिल्ली आणि मुंबईचे स्थान)

जगातील राहण्यायोग्य दहा शहरे - 

1. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया

2. मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

3. सिडनी, ऑस्ट्रेलिया

4. ओसाका, जपान

5. कॅलगरी, कॅनडा

6. व्हँकुव्हर, कॅनडा

7. टोरोंटो, कॅनडा

8. टोकियो, जपान

9. कोपेनहेगन, डेन्मार्क

10. अ‍ॅडिलेड, ऑस्ट्रेलिया

या यादीमध्ये जगातील एकूण 140 शहरांचा समावेश केला गेला आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये भारताचे एकही शहर पहिल्या 100 मध्येही नाही. 56.3 गुणांसह नवी दिल्ली 118 स्थानावर तर 56.3 गुणांसह मुंबई 119 स्थानावर आहे. पाकिस्तानमधील कराची शेवटच्या 10 मध्ये आहे.