Kamala Harris (Photo Credits: PTI)

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती (Vice President) कमला हॅरिस (Kamala Harris) या शुक्रवारी राष्ट्राध्यक्षपदाची (Presidential Powers) धुरा सांभाळणाऱ्या अमेरिकेतील पहिल्या महिला ठरल्या. अध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांनी शुक्रवारी त्यांचे अधिकार तात्पुरते उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे हस्तांतरित केले. जो बिडेन यांना त्यांच्या नियमित तपासणीवेळी भूल देण्यात आली होती त्यावेळी साधारण साधारण 1 तास 25 मिनिटे कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची सूत्रे सांभाळली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन शुक्रवारी नियमित कोलोनोस्कोपी तपासणीसाठी वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये गेले होते.

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, 'कोलोनोस्कोपी' दरम्यान बिडेन 'अनेस्थेसिया'च्या प्रभावाखाली असणार होते, म्हणूनच त्यांनी त्यांचे अधिकार तात्पुरते हॅरिसकडे सोपवले. अशाप्रकारे, अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या महिल्या कमला हॅरिस यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेऊन इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरात आपले नाव कोरले आहे. जेन साकी यांनी सांगितले की बिडेन यांनी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:35 वाजता हॅरिस आणि व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ रॉन क्लेन यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर हॅरिस यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली.

अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षपद भूषवणारे बायडेन हे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. आज बिडेन त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ते त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी शुक्रवारी सकाळी वॉशिंग्टनच्या बाहेरील वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमध्ये गेले होते. दरवर्षी त्यांची तपासणी आणि उपचार होत असले, तरी यावर्षी जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच उपचार आहे. कोलोनोस्कोपी तपासणीदरम्यान बिडेन यांना भूल देण्यात आली, त्यामुळे या काळात अध्यक्षीय सत्ता हॅरिस यांच्याकडे राहिली.

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन म्हणाले की, हा अमेरिकेच्या राज्यघटनेत घालून दिलेल्या प्रक्रियेचा एक भाग आहे. जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळातही तत्कालीन उपराष्ट्रपती डिक चेनी यांना अनेकवेळा अध्यक्षीय सत्ता सांभाळावी लागली. अमेरिकन राज्यघटनेच्या 25 व्या दुरुस्तीच्या कलम-3 अंतर्गत अध्यक्षीय अधिकार हस्तांतरित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.