TikTok Ban: सायबर सुरक्षा, गोपनीय माहितीच्या गैरवापरामुळे टिकटॉक ॲपवर अनेक देशात बंदी; भारतास १७ देशाचा समावेश
TikTok (Photo Credit- Wikimedia Commons)

TikTok Ban: टिकटॉक ॲपच्या माध्यमातून चीन सरकार अमेरिकन वापरकर्त्यांची हेरगिरी करत असल्याचा ठपक ठेवत यूएस सिनेटने सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे अमेरिकेत येत्या काही काळात TikTok वर बंदी घालण्यात येणार आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, यूएस सिनेटने टिकटोक बॅन विधेयक मंजूर केले आहे. कोविड-19 महामारीच्या काळात 19 जून 2020 रोजी टिकटॉकवर बंदी घालणारा भारत हा पहिला देश ठरला होता.

टिकटॉकवर गोपनीयता आणि सायबर सुरक्षा चिंतेमुळे केवळ भारत आणि युनायटेड स्टेट्समध्येच नाही तर इतर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. काही देशांनी ॲपवर अंशतः बंदी घातली आहे. जाणून घेऊयात अशा देशांची यादी.

भारत: भारत सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये टिकटॉकसह 118 चिनी ॲपवर बंदी घातली होती. त्यानंतर डिसेंबर 43 ॲप्सवर आणि 2023 मध्ये 300 हून अधिक ॲप्सवर बंदी घातली होती.

ऑस्ट्रेलिया : एप्रिल 2023 मध्ये, ऑस्ट्रेलियाने सुरक्षिततेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घातली.

युरोपियन युनियन: युरोपियन युनियनमधील अनेक टेक कंपन्यांनी त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत टिकटॉकवर बंदी घातली. अनेक कर्मचाऱ्यांच्या गोपणीय माहिती लीक झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

फ्रान्स: डेटा सुरक्षा उपायांच्या कारणास्तव फ्रान्सने टिकटॉकवर बंदी घातली आहे. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा लीक झाल्याचे समोर आले होते.

तैवान: FBI ने चेतावणी दिल्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये तैवानने TikTok वर बंदी घातली होती. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असे सांगतटिकटॉकवर बंदी घालण्यात आली.

पाकिस्तान: ॲपची 'अनैतिकता' लक्षात घेऊन, पाकिस्तानने एका अहवालानुसार, चार वेळा टिकटॉकवर बंदी घातली.

नेपाळ: एका अहवालानुसार, नेपाळने आपल्या "सामाजिक सौहार्दाचे" रक्षण करण्यासाठी टिकटॉकवर बंदी घातली.

न्यूझीलंड: न्यूझीलंडच्या संसदेतील खासदार आणि कर्मचाऱ्यांच्या उपकरणांबद्दल सायबर सुरक्षिततेच्या चिंतेमुळे टिकटॉक ॲपवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

या यादीत कॅनडा, बेल्जियम, किरगिझस्तान, माल्टा, लाटविया, डेन्मार्क, नेदरलँड, नॉर्वे, ऑस्ट्रिया, आयर्लंड या देशांचाही समावेश आहे.