जवळजवळ दीड वर्षांचा कालावधी लोटूनही कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीविषयीचे (Coronavirus Origin) रहस्य अद्याप समोर आले नाही. हा विषाणू वुहान प्रयोगशाळेतून (Wuhan Lab) बाहेर पडला असल्याचे काही वैज्ञानिकांचे मत आहे, तर दुसरीकडे चीन (China) असे म्हणत आहे की हा विषाणू प्राण्यांच्या माध्यमातून मानवांमध्ये पोहोचला. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटमा (WHO) कोविड-19 च्या उत्पत्तीचा शोध घेण्याची पुन्हा एक योजना आखत आहे. या विषाणूबाबतच्या दुसऱ्या टप्प्यातील तपासणीची योजना डब्ल्यूएचने मांडली आहे, ज्यावर चीन रागावला आहे.
डब्ल्यूएचओ पुन्हा एकदा अशी तपासणी करणार असल्याचे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटल्याचे चीनने म्हटले आहे व त्यांनी या योजनेला पूर्णतः नकार दिला आहे. चीनने त्याला विज्ञानाचा अपमान म्हटले आहे. फेब्रुवारीमध्येही डब्ल्यूएचओने कोरोना उत्पत्तीसंदर्भात एक तपासणी केली होती. चीनच्या एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, कोविड-19 च्या उत्पत्तीची चौकशी करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या योजनेमुळे आम्हाला धक्काच बसला.
नॅशनल हेल्थ कमिशनचे उपमंत्री झेंग येक्सिन (Zeng Yixin) यांनीही ‘वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’च्या प्रयोगशाळेपासून हा विषाणू पसरल्याचा अंदाज फेटाळून लावला. डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, जागतिक महामारी आणि चीनी लॅबमधून कोरोनाव्हायरस बाहेर पडल्याचा संभाव्य दुवा इतक्या लवकर नाकारू शकत नाही. झेंग यांनी या सिद्धांताला अफवा म्हटले आहे, जे विज्ञानाच्या विरुद्ध आहे.
डब्ल्यूएचओने या महिन्यात चीनमधील कोरोनाव्हायरसच्या उत्पत्तीच्या अभ्यासाचा दुसरा टप्पा प्रस्तावित केला आहे. यात वुहान शहरात स्थित लॅब आणि मार्केटच्या ऑडिटचा समावेश आहे. याखेरीज उत्पत्तीबाबतच्या तपासात चीनी अधिकाऱ्यांकडून पारदर्शकतेची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात तज्ञांमध्येही वाद आहे. (हेही वाचा: China Floods: चीनमध्ये गेल्या 1000 वर्षातील सर्वात मुसळधार पाऊस; लाखो लोक स्थलांतरीत, Apple City बुडाली)
दरम्यान, मार्चमध्ये डब्ल्यूएचओच्या नेतृत्वाखालील पथकाने कोरोना विषाणूबाबतच्या तपासणीसाठी वुहान येथे चार आठवडे व्यतीत केले होते. नंतर संयुक्त अहवालात, संघाने प्राण्यांद्वारे हा व्हायरस पसरल्याचे सांगितले होते, ज्यावर अमेरिकेसह अनेक देशांचा विश्वास नव्हता. यानंतर सर्व देशांनी एकत्र येऊन पुन्हा चौकशीची मागणी केली.