YouTube च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 8 वर्षांचा मुलगा अव्वल; व्हिडीओज बनवून कमावले तब्बल 155 कोटी
रायन (Photo credit : Youtube)

सध्या यूट्यूब (YouTube) हे फक्त मनोरंजनाचे माध्यम राहिले नसून, बक्कळ पैसे कमावण्याचे एक उत्तम साधन बनले आहे. होय, तुम्हाला कल्पना नसेल पण यूट्यूबच्या या व्हिडिओजमधून लाखो रुपयांची कमाई करता येऊ शकते. फोर्ब्स मासिका (Forbes Magazine)ने 2017 ते 2018 या दरम्यान यूट्यूबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. ही यादी वाचून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल, कारण या यादीत पहिले स्थान पटकावले आहे ते एका 8 वर्षाच्या मुलाने. रायन (Ryan) असे या मुलाचे नाव असून, त्याने गेल्या वर्षभरात यूट्यूबवरील व्हिडीओजच्या माध्यमातून 22 मिलियन डॉलर्स (1,55,13,30,000 रुपये) कमावले आहेत.

तर हा रायन नक्की करतो काय?

रायन हा 8 वर्षांचा मुलगा असल्याने साहजिकच त्याचा ओढा खेळण्यांकडे जास्त आहे. याच गोष्टीचा वापर रायन व्हिडीओज बनवण्यासाठी करतो. रायन विविध खेळण्यांचे, बाजारात नवीन आलेल्या खेळण्याच्या साधनांचे तसेच लहान मुलांच्या विविध खेळांचे रिव्ह्यूज बनवतो. हे व्हिडीओ बनवण्यात रायनच्या आईची त्याला मोलाची साथ आहे. रायन आणि त्याची आई मिळून विविध खेळदेखील खेळतात आणि या गोष्टींचेच व्हिडिओ ते यूट्यूबवर अपलोड करतात.

रायनच्या पालकांनी मार्च 2015 मध्ये ‘रायन टॉईजरिव्ह्यू’ (Ryan ToysReview) हे यूट्यूब चॅनल सुरू केले. अल्पवधीतच या नटखट रायनच्या करामती लोकांना आवडू लागल्या. रायनच्या व्हिडीओला आतापर्यंत 26 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत, तर त्याच्या यूट्यूब फॉलोअर्सची संख्या 1.73 कोटी इतकी आहे.

अशी होते कमाई –

रायनच्या या चॅनलची प्रसिद्धी पाहता अनेक लोक त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. रायनला मिळणाऱ्या मानधनापैकी 1 मिलियन त्याला व्हिडीओ सुरू होण्याआधी दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून मिळाले आहेत, तर बाकीची कमाई प्रायोजकांच्या माध्यमातून झाली आहे.

रायन त्याच्या चॅनेलवर जी खेळणी दाखवतो त्यांची विक्री अगदी जोरात होते. त्यामुळेच वॉलमार्टने रायनला करारबद्ध केले आहे. रायन्स वर्ल्ड (Ryan's world Toys) या नावाखाली वॉलमार्ट (Walmart) कडून अमेरिकेच्या 2500 दुकानांमध्ये खेळण्यांची विक्री केली जाते. वॉलमार्टने ऑगस्टमध्ये रायन वर्ल्ड या नावाने कपडे आणि खेळण्यांचा ब्रँडदेखील लॉन्च केला आहे. यामधूनही रायन कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.

सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 यूट्यूब चॅनल्स - 

1) रायन टॉईज रिव्ह्यू (Ryan Toys Review) - 154.84 कोटी रुपये

2) जेक पॉल (Jake Paul) - 151.32 कोटी रुपये

3) ड्यूड परफेक्ट (Dude Perfect) - 140.74 कोटी रुपये.

4) डॅन टीडीएम (DanTDM) - 130.21 कोटी रुपये

5) जेफ्री स्टार (Jeffree Star)  - 126.67 कोटी रुपये

6) मार्किप्लायर (Markiplier)  - 123.15 कोटी रुपये

7) व्हॅनोस गेमिंग (Vanoss Gaming) - 119.63 कोटी रुपये

8) जॅकसेप्टिस आय (Jacksepticeye) - 112.61 कोटी रुपये

9) प्यूडायपाय (PewDiePie) - 109 कोटी रुपये

10) लोगन पॉल (Logan Paul) - 102 कोटी रुपये