Tasmanian Devils: काय सांगता? तब्बल 3000 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या जंगलात 'तस्मानियन डेव्हिल्स'चा जन्म; विलुप्त झाली होती प्रजाती
Tasmanian Devils (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या जगभरात एका अदृश्य विषाणूमुळे हाहाकार माजला आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या (Australia) जंगलात विलुप्त झालेला प्राणी तस्मानियन डेव्हिल्सचा (Tasmanian devils) जन्म झाला आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने ही एक मोठी घटना आहे, कारण या तस्मानियन डेव्हिल्सचा जन्म सुमारे 3000 वर्षांनंतर झाला आहे. तस्मानियन डेव्हिल हा एक कुत्र्यासारखा लहान प्राणी आहे. हा जगातील सर्वात मोठा मार्सूपेल कार्निव्होर म्हणूनही ओळखला जाते. सुमारे 3000 वर्षांपासून त्यांच्या प्रजातीचा कोणताही जीव जन्माला आला नव्हता. परंतु आता तस्मानियन डेव्हिलच्या जन्माच्या बातमीने पर्यावरणप्रेमींना आनंद झाला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या तस्मानियामध्ये डेव्हिल आर्क सेंचुरी आहे. हे लहान डोंगरासारखे स्थान असून ज्याला बॅरिंग्टन टॉप (Barrington Top) म्हटले जाते. या सेंचुरीच्या अधिकाऱ्यांनी आणि संवर्धन गटाने 7 तस्मानियन डेव्हिल्सना एका खड्ड्यात पाहिले. त्यांची आई आसपास दिसत नव्हती. या प्राण्यांना पाहून आशा निर्माण झाली आहे की, त्यांची संख्या आता वाढू शकेल.

आधी या प्राण्यांची शिकार इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की, या प्रजातीचे सर्व प्राणी नष्ट झाले. डिंगोस या वन्य कुत्र्याच्या प्रजातीला तस्मानियन डेव्हिल्सचे मांस आवडते. त्यामुळे जसजसे डिंगोस वाढत गेले, तस तसे तस्मानियन डेव्हिल्स कमी होत गेले. याशिवाय, चेहऱ्याचा ट्यूमर ही समस्या तस्मानीय डेविल्समध्ये सामान्य आहे, जी त्यांच्यासाठी प्राणघातक ठरते. त्यांना वाचविण्यासाठी पशु संवर्धन गट खूप प्रयत्न करीत आहे. 2008 पासून संयुक्त राष्ट्राने या प्राण्यांना रेड लिस्टमध्ये घातले आहे.

मोठे डोके व मजबूत मान असलेले हे प्राणी वेगाने धाव घेऊ शकतात, झाडावर चढू शकतात आणि पाण्यात पोहू शकतात. तज्ञ सांगतात की, तस्मानियन डेव्हिल्स त्यांच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच मादाशी संबंध ठेवतात. मादी आपल्या आयुष्यात 4 वेळा मुलांना जन्म देऊ शकते. ती एकावेळी 20 ते 30 मुलांना जन्म देऊ शकते. तस्मानियन डेविल्सचे वैशिष्ट्य म्हणजे ते अंधारात शिकार करतात. आता या प्राण्यांची लोकसंख्या वाढविण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार हे प्राणी वेगवेगळ्या देशांच्या प्राणिसंग्रहालयात पाठवत आहे. जेणेकरून त्यांचे संवर्धन आणि प्रजातींचा विकास होऊ शकेल.