Sunita Williams (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) सुमारे नऊ महिने व्यतीत केलेले, नासा अंतराळवीर सुनिता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विलमोर मंगळवार, 18 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर परत येणार आहेत. नासाचे अंतराळवीर स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलमध्ये बसून पृथ्वीकडे रवाना झाले आहेत. सुनीता विल्यम्स या त्यांचे क्रू सदस्य बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांच्यासह भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) बुधवार, 19 मार्च रोजी पृथ्वीवर उतरण्याची अपेक्षा आहे. त्यांचे मूळ 10-दिवसीय मिशन हे बोइंग स्टारलाइनर कॅप्सूलमधील तांत्रिक अडचणींमुळे लांबले, ज्यामुळे त्यांना स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूल ‘फ्रीडम ‘द्वारे परत आणले जात आहे. ​

विल्यम्स आणि विलमोर यांच्यासोबत अमेरिकन अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह देखील आहेत, ज्यांनी त्यांच्या नियोजित 6 महिन्यांच्या मिशनची पूर्तता केली आहे. त्यांचा परतीचा प्रवास 17 तासांचा असेल, ज्याची समाप्ती फ्लोरिडा किनार्‍याजवळ अटलांटिक महासागरात स्प्लॅशडाउनने होईल. ​या विस्तारित मिशनदरम्यान, विल्यम्स आणि विलमोर यांनी आयएसएसवर 4,500 हून अधिक परिक्रमांमध्ये 121 दशलक्ष मैलांपेक्षा जास्त प्रवास केला आहे.

आता चारही अंतराळवीर ड्रॅगन अंतराळयानात चढल्यानंतर, सकाळी 08.35 वाजता अंतराळयानाचा हॅच बंद करण्यात आला आणि सकाळी 10.35 वाजता अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळे झाले. ते भारतीय वेळेनुसार 19 मार्च रोजी पहाटे 3.27 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरेल. त्याआधी स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूल हे रविवारी (16 मार्च) आयएसएसवर पोहोचले. अमेरिकन अंतराळ संस्थेने शुक्रवारी (यूएस टीटाइम) रोजी क्रू-10 मोहीम सुरू केली, ज्यामध्ये बदली क्रूला आयएसएसवर नेण्यासाठी फाल्कन 9  रॉकेटचा वापर केला गेला. ही नवीन टीम विल्यम्स आणि तिच्या टीमची जागा घेईल. (हेही वाचा: भारतीय वंशाच्या NASA अंतराळवीर Sunita Williams यांना PM Narendra Modi यांचं खास पत्र; भारत भेटीचं आमंत्रण)

पृथ्वीवर लँडिंगनंतर, विल्यम्स आणि क्रू यांना त्यांच्या वैद्यकीय तपासणी आणि मोहिमेनंतरच्या इतर उपचारांसाठी टेक्सासमधील ह्युस्टन येथील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये नेले जाईल, जे त्यांना नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचे पुन्हा समायोजन करण्यास मदत करेल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनिता विल्यम्स यांना पत्र लिहून त्यांच्या सुरक्षित परतीसाठी शुभेच्छा दिल्या आणि भारतातील 1.4 अब्ज लोक त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचे नमूद केले.