पाकिस्तानातील (Pakistan) वायव्य पेशावर (Peshawar) शहरातील पोलीस लाईन परिसरातील मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यातील (Peshawar Suicide Blast) मृतांचा आकडा वाढतो आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार हा आकडा आता 83 वर पोहोचला आहे. पेशावरमधील कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या आणि नागरिकांनी प्रार्थनेसाठी खचाखच भरलेल्या मशिदीत (Mosque) 30 जानेवारी रोजी दुपारी 1.00 च्या सुमारास आत्मघातकी हल्ला झाला. एका तालिबाणी अत्मघातकी बॉम्बरने स्वत:ला उडवून दिले.
पेशावर येथील पोलीस लाइन्स येथील मशिदीत हा आत्मघातकी हल्ला झाला. द न्यूज इंटरनॅशनलनेच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आत्मघातकी बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 83 वर गेली आहे, त्यानंतर आणखी नऊ मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. (हेही वाचा, Blast In Peshawar: पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीत स्फोट, अनेक जण ठार झाल्याची भीती)
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. खैबर पख्तुनख्वाचे काळजीवाहू मुख्यमंत्री मुहम्मद आझम खान यांनी या हल्ल्यानंतर मंगळवारी प्रांतात एक दिवसाचा शोक जाहीर केला. ते म्हणाले की, संपूर्ण प्रांतात राष्ट्रध्वज अर्ध्यावर घेण्यात येईल.
मुहम्मद आझम खान यांनी यांनी पुढे सांगितले की, आत्मघातकी हल्लांमध्ये झालेल्या जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयंना प्रांतीय सरकार एकटे सोडणार नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ पेशावर येथे पोहोचले आणि त्यांना बॉम्बस्फोटाच्या सर्व पैलूंची माहिती देण्यात आली आणि त्यांनी जखमींची भेटही घेतली, असे द न्यूज इंटरनॅशनलने म्हटले आहे.
दरम्यान, खैबर पख्तुनख्वाचे पोलीस महानिरीक्षक मोअज्जम जाह अन्सारी म्हणाले की, हा हल्ला कसा झाला आणि दहशतवादी आजूबाजूच्या परिसरात कसा घुसला याबाबत तपास सुरू आहे.