Sinopharm Vaccine: पाकिस्तानने दिली चीनची कोरोना विषाणू लस 'सिनोफार्म'ला मंजुरी; Most Unsafe सह 73 दुष्परिणाम दिसल्याचा केला आहे दावा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या कोरोना विषाणू लसीच्या (Coronavirus Vaccine) आपत्कालीन वापरास मंजुरी दिल्यानंतर, दोन दिवसांनी पाकिस्तानने (Pakistan) चीनच्या (China) सिनोफार्मची (Sinopharm) कोविड-19 लसदेखील मंजूर केली आहे. ही माहिती एका अधिकृत निवेदनात दिली गेली आहे. ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ पाकिस्तानने म्हटले आहे की, चीन नॅशनल फार्मास्युटिकल ग्रुपने (SinoPharm) तयार केलेल्या या लसीला आपत्कालीन उपयोग मंजुरी (EUA) देण्यात आली आहे. पाकिस्तानने यापूर्वीच सिनोफार्मच्या कोविड-19 लसच्या 11 लाख डोसची ऑर्डर दिली आहे आणि लवकरच त्याची आयात प्रक्रिया सुरू होईल. पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारपर्यंत कोरोना विषाणूमुळे देशात 11,055 लोकांचा मृत्यू झाला आहे.

या लसींचा पुढील तीन महिन्यांत सुरक्षा, कार्यक्षमता आणि गुणवत्ता या संदर्भात आढावा घेण्यात येईल, असे प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तान अनेक लसी उत्पादकांशी चर्चा करीत आहे. आरोग्यमंत्री फैसल सुल्तान यांनी गेला आठवडा संपायच्यावेळी सांगितले की, चीनच्या कॅन्सिनो बायोलॉजिक्सबरोबर (CanSino Biologics) झालेल्या कराराचा एक भाग म्हणून लसीचे कोट्यवधी डोस देशाला मिळू शकतील. लस कंपनीच्या Ad5-nCoV COVID-19 या लसच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पाकिस्तानमध्ये पूर्णत्वास येत आहे. सुल्तान म्हणाले की, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कॅन्सिनो लसीचा प्रारंभिक निकाल येऊ शकतो. मात्र पाकिस्तानने अद्याप कोणतीही लस खरेदी करण्याचा आदेश दिलेला नाही.

मंत्री म्हणाले की पाकिस्तानने बहुतांश लोकसंख्येचे लसीकरण विनामूल्य करण्याचे नियोजन केले आहे. खाजगी कंपन्यांनाही लसांची आयात व विक्री करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. दरम्यान, याआधी एका चिनी डॉक्टरने ‘सिनोफार्म’ची कोरोना व्हायरस लस ही ‘जगातील सर्वात असुरक्षित’ लस असल्याचे सांगितले होते. तसेच त्याचे 73 दुष्परिणाम असल्याचा दावा केलाहोता. शांघाय येथील लस तज्ज्ञ डॉ ताओ लीना (Dr Tao Lina) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सिनोफार्म लसीविषयी माहिती दिली मात्र नंतर त्यांनी ती पोस्ट काढून टाकली.