लंडनच्या राजघराण्यात लग्न म्हटलं की चर्चा ही होणारचं ! काही दिवसांपूर्वी लंडनची राणी एलिझाबेथ यांची नात युजिना विवाहबंधनात अडकली. नवरी म्हटली की तिच्या लग्नाच्या कपड्यांकडे सार्यांचे लक्ष असते. परंतू राजकन्या युजिनाचा वेडिंग गाऊन यंदा खास चर्चेमध्ये आला आहे. युजिनाला तिच्या पाठीवरची शस्त्रक्रियेची जखम लोकांसमोर ठेवायची होती म्हणून तिने खास बॅकलेस ड्रेस डिझाईन केला होता.
सौंदर्याची व्याख्या बदलण्यासाठी
सौंदर्य म्हणून त्वचेचा गोरा रंग़, शरीरावर कसलाच डाग, व्रण नसणं... सारं अगदी आखिव -रेखीव म्हणजेच रूपवती अशी अनेकांची धारणा असते. वयाच्या 12 व्या वर्षी युजिनावर शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेचे व्रण अजूनही तिच्या पाठीवर आहेत. लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवशी तिने हा व्रण अभिमानाने लोकांसमोर ठेवून या आजाराबाबात समाजात जनजागृतीसाठी पाऊल ठेवल्याचा संदेश दिला आहे. तसेच या आजारातून बाहेर पडताना ज्या लोकांनी तिला साथ दिली त्यांच्याबद्दल आदरही व्यक्त केला आहे.
युजिनावर स्कोलिऑसिसची शस्त्रक्रिया
स्कोलिऑसिस या आजारामध्ये जन्मतः काही मुलांच्या पाठीमध्ये बाक निर्माण होतो. सेरेबल पाल्सीसारख्या आजारातील मुलांमध्येही हा दोष निर्माण होतो. तसेच गर्भाच्या वाढीदरम्यान दोष निर्माण झाल्यानेही हा आजार बळावण्याची शक्यता असते.
शस्त्रक्रियेच्या मदतीने स्कोलिऑसिसमध्ये पाठीचा बाक नीट केला जातो. या आजारात पाठीचा कणा एका बाजूला झुकल्याने खांद्याची हाडं बाहेर येतात. युजिनीवर लंडनच्या रॉयल नॅशनल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. पाठीचा कणा सरळ करण्यासाठी त्याजागी दोन्ही बाजूला रॉडचा आधार देण्यात आला आहे.
ऑपरेशननंतर युजिना काही दिवस व्हिलचेअरवर होती. त्यानंतर काही दिवसांनी ती स्वतःच्या पायावर उभी राही शकली. अगदीच कोवळ्या वयांत मुलांमध्ये हा आजार अधिक बळावतो. वेळीच हा आजार ओळखता न आल्यास अनेकांना त्यांचं पुढील सारं जीवन व्हिलचेअरवरच काढावं लागतं. अशा मुलांसाठी आता युजिनमुळे जागृती अधिक वाढण्याची शक्यता आहे.
राणी एलिथाबेथ यांचा मुलगा अॅण्ड्यु- ड्यूक ऑफ यॉर्क यांची मुलगी म्हणजे युजिना. युजिना जॅक ब्रुक्सबॅंकसोबत विवाहबंधनात अडकली. विंडसर कॅसलच्या सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला. ब्रिटनमधील अनेक मान्यवरांनी या लग्नाला हजेरी लावली होती.