Pope Francis (Photo Credits: Wikimedia Commons/File)

Pope Used Vulgar Term For Gay People: सध्याचे पोप, कॅथोलिक चर्चचे प्रमुख, रोमचे बिशप आणि व्हॅटिकन सिटी राज्याचे सार्वभौम 'पोप फ्रान्सिस' (Pope Francis) हे त्यांच्या मुक्त विचारांसाठी ओळखले जातात. याआधी अनेकवेळा पोप फ्रान्सिस यांनी समलैंगिक लोकांबद्दल (Gay People) सार्वजनिकरीत्या आदर व्यक्त केला आहे. मात्र आता पोप एका शब्दामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पोप फ्रान्सिस यांनी समलिंगी लोकांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरला आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे. वृत्तानुसार, पोप फ्रान्सिस हे इटालियन बिशपसोबत बंद दरवाजाआड बैठक घेत होते. या बैठकीमध्ये त्यांनी समलैंगिक लोकांसाठी इटालियन भाषेत अपमानास्पद शब्दाचा वापर केला.

जरी ही बैठक बंद दाराच्या मागे झाली असली तरी, पोपच्या नोंदवलेल्या टिप्पण्या त्यांनी वापरलेल्या शब्दाबाबत, प्रथम इटालियन टॅब्लॉइड वेबसाइट डागोस्पियाला कळवण्यात आले. त्यानंतर इतर इटालियन वृत्तसंस्थांनी अनेक स्त्रोतांचा हवाला देऊन पोपच्या शब्दांची पुष्टी केली. आता याबाबत गदारोळ माजल्यानंतर व्हॅटिकनने जाहीररित्या माफी मागितली आहे.

अहवालानुसार, इटालियन बिशप कॉन्फरन्समध्ये पोप फ्रान्सिस यांना विचारण्यात आले की, ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्या समलिंगी पुरुषांना पाद्री होण्याचे प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली पाहिजे का? यावर पोप फ्रान्सिस यांनी नाही म्हणून सांगितले. ते इटालियन भाषेत बोलत होते. समलैंगिक पुरुषांच्या सेमिनरीजमध्ये प्रवेश करण्यावर चर्चा करताना, पोप म्हणाले की, सेमिनरी आधीपासूनच ‘फ्रोसियागिन’ (Frociaggine) ने भरलेली आहेत. (हेही वाचा: इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान रोहित शर्माची पत्नी Ritika Sajdeh ने शेअर केली 'All Eyes on Rafah' मोहिमेला पाठींबा दर्शवणारी इंस्टाग्राम स्टोरी; 'खाते हॅक झाले का?' चाहत्यांचा प्रश्न)

सर्वसामान्यपणे ‘फ्रोसियागिन’ हा आक्षेपार्ह इटालियन शब्द असून, तो समलैंगिक लोकांचा अपमान करण्याच्या किंवा त्यांना कमी लेखण्याच्या उद्देशाने वापरला जातो. पोप फ्रान्सिस यांनी या शब्दाचा वापर केल्याचे समजताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एका पोपकडून अशा शब्दाची अपेक्षा नसल्याचे मत लोकांनी व्यक्त केले. ही बाब चिघळू लागल्यानंतर व्हॅटिकनने एक निवेदन जारी करत पोपने वापरेल्या शब्दाबद्दल माफी मागितली. व्हॅटिकनने म्हटले, ‘चर्चमध्ये प्रत्येकासाठी जागा आहे, कोणीही निरुपयोगी किंवा अनावश्यक नाही, इथे सर्वांसाठी जागा आहे. पोपचा कधीही कोणाचा अपमान करण्याचा किंवा होमोफोबिक भाषा वापरण्याचा हेतू नव्हता. त्यांच्या एखाद्या शब्दाच्या वापराने जो कोणी दुखावले असेल अशा प्रत्येकाची माफी मागतो.’