Peshawar Bomb Blast: पाकिस्तानातील पेशावर येथे बॉम्बस्फोट, 5 ठार, 50 पेक्षा अधिक जखमी
Blast, Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

पाकिस्तानमधील (Pakistan) महत्त्वाचे शहर असलेले पेशावर (Peshawar) आज भयंकर अशा बॉम्बस्फोटाने (Peshawar Bomb Blast) हादरुन गेले. या बॉम्बस्फोटात 5 जण ठार तर 50 पेक्षाही अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना मदरसा, दीर कॉलनी येथे मंगळवारी (27 ऑक्टोबर) सकाळ घडली. मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे. जखमींना जवळच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे.

पाकिस्तानातील जिओ न्यूज आणि एएनआय या वृत्तसंस्थांनी याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, गेल्या काही काळातील हा सर्वात भयावह बॉम्बस्फोट आहे. यात 5 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी बॉम्बस्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट केले नाही. काही लोकांनी दावा केला आहे की हा सिलिंडर स्फोट आहे. पाकिस्तान पोलीस घटनास्थळी पोहोचले असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, खैबर पख्तूनख्वा पोलीस प्रमुख डॉ. सनाउल्लाह अब्बासी आणि एसएसपी मन्सूर अमन यांनी बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची चौकशी सुरु आहे. आतापर्यंत या स्फोटाचे नेमके कारण पुढे येऊ शकले नाही. एका मदरशात शिक्षण सुरु असताना हा स्फोट झाला आहे. (हेही वाचा, Sex Change Surgery: सख्ख्या बहिणी झाल्या पक्के भाऊ, सेक्स चेंज शस्त्रक्रियेने केली कमाल; पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या गुजरात जिल्ह्यातील घटना)

एलआर हॉस्पीटलचे प्रवक्ता मोहम्मद असिम यांनी म्हटले आहे की, आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने उपचार सुरु आहेत. सर्व जखमींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. यासोबतच रुग्णालयाकडून आणिबाणीची घोषमा करण्यात आली आहे. म्हणजेच रुग्णालयातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बोलावण्यात आले आहे.