Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आधीच्या दोन पतींचं निधन झाल्यानंतर एका महिलेनं तिसऱ्या विवाहाची इच्छा व्यक्त केली म्हणून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानातून समोर आली आहे. सख्ख्या भावांनीच या महिलेची हत्या केली आहे.  कराचीमधील बहादुरबादमध्ये ही घटना घडली. आपण तिसरं लग्न करण्याचा विचार करत आहोत, असं या महिलेनं तिच्या भावांना सांगितलं असता त्यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघा भावांनी महिलेची गोळ्या झाडून हत्या केली.  (हेही वाचा - Korean War Anniversary: किम जोंग उन यांच्या आदेशाने शत्रूंचा संपूर्ण नाश करणार- उत्तर कोरिया लष्कर)

घटनेची माहिती मिळताच कराची पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तिथे पोलिसांना घरात 30 पिस्तुलं आणि झाडलेल्या दोन गोळ्यांचे कवच सापडले. यासंदर्भात पुढील तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आधीच्या दोन पतींपासून सदर महिलेला एकूण ९ मुलं असून त्यांची जबाबदारीही महिलेनं स्वत: उचलण्याची तयारी दाखवली होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान पाकिस्तानच्या गुल शहरात एका महिलेनं कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून घटस्फोटाची याचिका न्यायालयात दाखल केली म्हणून तिच्या वडिलांनी व काकांनी तिचे पाय कापल्याची घटना घडली होती. या महिलेला तिच्या पतीकडून वारंवार मारहाण केली जात होती, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला घटस्फोट हवा असल्याची मागणी तिने केली होती.